सोलापूर - अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाने सोलापूर शहरातील कुंटणखान्यावर छापा टाकला आहे. हा कुंटणखाना एक महिला चालवत होती. पोलिसांनी तिला अटक करून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. तसेच बसस्थानक परिसरात असलेल्या एका लॉजच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रागिणी वीरपक्षप्पा मोदी (50) रा. दक्षिण कसबा असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर कुसुम मनोहर मोरे (66) रा. मुरारजी पेठ असे लॉजच्या मालकाचे नाव आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी करण्यात आली.
या लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू आहे, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त कार्यालयातील मानवी तस्करी कक्षाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी एक बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता ही माहिती खरी निघाली. त्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी दुपारी सापळा रचून पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला. यावेळी रागिणी मोदी ही एका पीडित महिलेस पैसे देऊन वेगवेगळ्या ठिकाणी वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पीडित महिला ताब्यात घेऊन तिची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तसेच शहरात चालत असलेल्या अशा कुंटणखान्याची यादी तयार करून आणखी कारवाई करणार असल्याची पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी दिली.
हेही वाचा- 'मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सुत्रधारांची नावे पाकिस्तानने वगळली'