पंढरपूर (सोलापूर) - कोरोनाचा कहर सोलापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढतच चालला असून गेल्या तीन दिवसांत पंढरपूर शहर आणि तालुक्यात तब्बल 400 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. पंढरपुरातील पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली असून कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या संख्या 26 आहे. पंढरपूर येथील कोरोनाने एक हजाराचा टप्पा पार केला आहे. पंढरपूर पोलीस ठाण्यातील 52 वर्षीय अमिन अप्प मुलाणी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
अमिन मुलाणी यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यांच्यावर सोलापूर येथील हॉस्पिटलमधे उपचार सुरू होते. रविवार पहाटे उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. कोरोना पॉझिटिव्हसह त्यांना डायबेटीजचाही आजार होता.
मुलाणी हे पंढरपूर पोलीस कॉलनीत वास्तव्यास होते. आपल्या पत्नी, दोन मुले आणि एक मुलीसह त्यांचा सुखी संखार आनंदात सुरू होता. दोन्ही मुले महाविद्यालयात शिक्षण घेत असून त्यांच्या मुलीचे काही दिवसांपूर्वी लग्न ठरले होते. काही दिवसात मुलीचा लग्नाची तारीख ही काढली होती. एकुलत्या एका मुलीचा लग्न सोहळा न बघता कोरोनामुळे मुलाणी यांचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या महामारीने त्यांच्या आनंदी कुटुंबात दु:खाचा डोंगर कोसळला.
पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमधे चार पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत. एक जण उपचार घेत आहे. एक जणाचा मृत्यू झाला आहे.