सोलापूर - विनाकारण रस्त्यावर वाहन घेऊन फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पेट्रोल आणि डिझेल विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामधून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले आहे. विक्री बंद असतानाही आज सकाळी पेट्रोल भरण्यासाठी अनेकजण पेट्रोल पंपावर उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
प्रशासनाकडून घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात असताना रस्त्यावर दुचाकींची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. पोलिसांनी काही अंशी बळाचा वापर केला तरी रस्त्यावरची गर्दी कमी होताना दिसत नाही. सकाळी 8 ते दुपारी 2 यावेळेत पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. यामुळे जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेलची सर्वसामान्यांना होणारी विक्री बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर 25 मार्चच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेलची विक्री बंद करण्यात आली आहे. तरीही आज सकाळी सोलापूरकरांनी पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली आहे. पेट्रोल पंप बंद ठेवण्याचे आदेश दिले असले तरी त्यामध्ये अत्यावश्यक सेवा देणारी वाहने, शासकीय वाहने तसेच शासकीय कर्तव्यावरील व्यक्तींना यामधून वगळण्यात आले असल्याचेही शंभरकर यांनी सांगितले आहे.
निगराणीखालील २५ पैकी २२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह -
सोलापुरातील निगराणीखाली ठेवण्यात आलेल्या 25 जणांपैकी 22 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत, तर उर्वरीत तिघांचे रिपोर्ट हे आज येणार आहेत. तसेच केगाव येथील आयसोलेशन वार्डातील 53 पैकी 27 जण हे घरी परतले आहेत. अलगीकरणमध्ये ठेवण्यात आलेल्या 215 पैकी 78 व्यक्ती या घरी गेल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.