सोलापूर - जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात माथेफिरू रुग्णाने एका वृद्ध रुग्णाची हत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे सोलापूर सिव्हील प्रशासनाच्या सुरक्षेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मृत वृद्ध रुग्ण हा बेघर असून गेल्या अनेक दिवसांपासून त्यावर सिव्हील रुग्णालयामधील बी ब्लॉक या इमारतीत उपचार सुरू होते. ही घटना सोमवारी (काल) रात्री घडली असून याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच हत्या करणाऱ्या युसूफ पिरजादे या संशयीत आरोपी रुग्णाला पोलिसांनी अटक केली आहे.
बेघर रुग्णावर उपचार सुरू होते
एका सामाजिक कार्यकर्त्याने बेघर असलेल्या एका वृद्धाला उपचारासाठी सिव्हील रुग्णालयामध्ये दाखल केले होते. बी ब्लॉक या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर जनरल सर्जरी विभागात उपचार सुरू होते. त्याच ठिकाणी युसूफ पिरजादे हा छातीवर गाठ झाल्यामुळे उपचारासाठी दाखल झाला होता. सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अचानक युसुफ पिरजादे हा रुग्ण बेघर वृद्ध रुग्णाला शिवीगाळ करू लागला आणि अंगावर धावून आला.
सलाईनच्या रॉडने वार करत केली हत्या
युसूफ पिरजादे या माथेफिरू रुग्णाने सलाईन लावण्याच्या स्टॅण्ड रॉडने मारहाण करू लागला. या मारहाणीत बेघर वृद्ध रुग्णाला डोक्याला आणि मानेला जोरदार मार लागला आणि रक्तस्राव होऊ लागला. यामध्ये त्याला गंभीर जखम झाली. उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी आणि महिला परिचारकांनी माथेफिरू रुग्णाला बेडला बांधून ठेवले आणि जखमी रुग्णाला उपचारासाठी अतिदक्षता विभागात हलविले. मात्र मंगळवारी (आज) उपचार सुरू असताना बेघर वृद्ध रुग्णाचा मृत्यू झाला.
रुग्णांची सुरक्षा ऐरणीवर
सोलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात अशा माथेफिरू रूग्णांना दाखल केल्याने इतर रुग्णांची सुरक्षा धोक्यात आली आहे. सिव्हील रुग्णालयामध्ये महाराष्ट्र सुरक्षा बल सदैव तैनात असते. हे सुरक्षा बल फक्त रुग्णांच्या नातेवाईकांची अडवणूक करताना आढळतात. रुग्णांच्या सुरक्षितते विषयी यांना काहीही देणेघेणे नसते. नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
हेही वाचा - मुंबईत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला अटक