पंढरपूर - पांडुरंगाचा आषाढी एकादशी सोहळा 20 जुलै रोजी रंगणार आहे. या सोहळ्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरात भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी सात दिवसाची संचारबंदी जिल्हा प्रशासनाने लागू केली आहे. त्यामुळे आजपासून (18 जुलै) संचारबंदीची अंमलबजावणी पंढरपुरात जोरदारपणे चालू आहे. त्यासाठी पंढरपुरातील विविध भागांमध्ये बॅरीगेट्स लावण्यात आले आहेत.
विठ्ठल मंदिर परिसर बंद
उद्यापासून (19 जुलै) पंढरीत पालख्या दाखल होणार आहेत. पालख्यांसोबतच्या वारकऱ्यांशिवाय इतर वारकऱ्यांना पंढरीत प्रवेश दिला जाणार आहे. विठ्ठल मंदिर परिसर पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. कोरोनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
पंढरपुरात 2700 पोलीस तैनात
राज्य सरकारच्या निर्देशानुसार आषाढी वारी सोहळा प्रातिनिधिक स्वरूपात होणार आहे. तरी वाखरी ते पंढरपूर या दरम्यान पायी वारी पालखी सोहळा निघणार आहे. पंढरपुरात 18 जुलै ते 25 जुलै दरम्यान संचारबंदी असणार आहे. या संचारबंदीची अंमलबजावणी आजपासून पंढरपुरात करण्यात आली आहे. पंढरपूर शहरालगत नऊ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. पंढरपूर शहरातील अनेक भागांमध्ये चोख बंदोबस्त आहे. त्यासाठी पंढरपूर शहरात 2700 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
पंढरीतील आस्थापना बंद
आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा 20 जुलै रोजी होणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनांनुसार हा सोहळा प्रातिनिधिक व मर्यादित स्वरूपाचा केला जाणार आहे. त्यामुळे पंढरपूर शहरातील आस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्यात आजपासून सुरुवात झाली आहे. व्यापाऱ्यांनीही शासनाच्या सूचनांना शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे. पंढरपुरात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी सेवा करताना दिसत आहेत. पंढरपूर मंदिर समितीकडून पासधारक व परवानाधारकांना प्रवेश दिला जात आहे.
पालख्यांच्या विसाव्यासाठी वाखरी तळ सज्ज
वारकऱ्यांच्या सावळ्या विठुरायाचा आषाढी सोहळा राज्य शासनाकडून मर्यादित स्वरूपाचा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्य सरकारकडून पायी वारी आणि दिंड्यांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, मानाच्या 10 पालख्यांना पंढरपुरात परवानगी देण्यात आली. मानाच्या 10 पालख्यांच्या स्वागतासाठी पंढरपूर तालुका प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. वाखरी पालखी तळावर पालख्यांच्या विसाव्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे.
पंंढरीत येणार ही पहिली पालखी
विदर्भाची पंढरी म्हणून नावलौकिक असलेल्या माता रुक्मिणीचे माहेरघर असलेल्या अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूरमधील रुक्मिणीमातेची पालखी आज (18 जुलै) दोन एसटी बसने केवळ चाळीस वाऱ्यकऱ्यासह पंढरपूरकडे रवाना होणार आहे. तत्पूर्वी मंत्री यशोमती ठाकूर यांच्याहस्ते आज रुक्मिणी मातेच्या पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले. तसेच पालखीला प्रदक्षणा देखील घालण्यात आली. दरम्यान, पालखीचे यावर्षीचे 428 वे वर्ष आहे. तर, पंढरपूरला जाणारी महाराष्ट्रातली सर्वात पहिली पालखी असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - Pandharpur Wari 2021 : वाखरी पालखी तळ पालख्यांच्या स्वागतासाठी सज्ज