पंढरपूर (सोलापूर) - माळशिरस तालुक्यातील पिलीव, मळोली, धानोरे, शेंडचिंचोली, तोंडले, बोंडले या गावांच्या परिसरात दोन तासाच्या कालावधीत सुमारे 220 मिलीमीटर पाऊस झाला. यामुळे वीजयंत्रणा जमीनदोस्त झाली. तर पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव, सुपली, पळशी, उपरी, वाडीकुरुली या गावांत पुराच्या पाण्यामुळे वीजयंत्रणा कोसळली आहे. दोन्ही विभागात मिळून महावितरणचे जवळपास एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी दिली.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील वीजयंत्रणेचे नुकसान व वीजपुरवठ्याच्या स्थितीबाबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे आढावा घेतला. यावेळी महावितरणचे संचालक दिनेशचंद्र साबू, पुणे प्रादेशिकचे संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता सुनील पावडे, सोलापूरचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर उपस्थित होते.
पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यात 45 गावांमधील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. सुमारे 407 लघु व उच्चदाबाचे वीजखांब वाहिन्यांसह कोसळल्याने 12 उपकेंद्र, 76 उच्चदाब वीजवाहिन्या व दोन हजार 414 रोहित्रांचा वीजपुरवठा बंद पडला होता. परिणामी 33 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, 48 तासांच्या कालावधीमध्ये 80 टक्के घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा तर 78 टक्के कृषीपंप व इतर ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे 80 टक्के वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आल्याचेही त्यांनी सांगितले.