सोलापूर - सोलापुरात कोरोना विषाणूचे थैमान सुरूच आहे. आज (शुक्रवार) शहर आणि जिल्ह्यात 1500 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 24 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. एकीकडे कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी प्रशासन लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करत आहे. पण कोरोना रुग्ण आणि मृत्यूची संख्या कमी होत नाही.
सोलापूर शहरात आज 371 रुग्ण आढळले-
सोलापूर शहरात आज शुक्रवारी 371 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 224 पुरुष, तर 147 स्त्रिया आहेत. 7 रुग्णांचा कोरोना आजाराने बळी घेतला आहे. यामध्ये 6 पुरुष आणि 1 स्त्री आहे.
ग्रामीण भागात 1129 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह तर 17 मृत्यू-
सोलापूरच्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा उद्रेक झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात 1129 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यामध्ये 672 पुरुष तर 457 स्त्रिया आहेत. 17 जणांचा कोरोना आजाराने बळी घेतला आहे. यामध्ये 12 पुरुष व 5 स्त्रिया आहेत.
सोलापूर महानगरपालिकेकडून ई पास-
राज्य शासनाच्या आदेशानुसार कोविड-19साठी देण्यात आलेल्या आदेशानुसार होम डिलिव्हरी करणारी व्यक्ती अथवा हॉटेल, ई-कॉमर्स इतर लोकांना ये-जा करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून ई-पास देण्यात येणार आहे. त्यासाठी उद्यापासून महापालिकेच्या वेबसाईटवरती हॉटेल, ई-कॉमर्स, यांच्या आस्थापना विभागाच्या संबंधितांनी ऑनलाइन अर्ज करावे. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून करण्यात येणार आहे. अर्ज करत असताना त्या व्यक्तीचा फोटो, आधार कार्ड व आरटीपीसीआर निगेटिव्ह सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. रजिस्टर झाल्यानंतर आपल्या अर्जाची तपासणी केल्यानंतर 1 तासात पास देण्यात येईल. ई-पास करिता कुठेही जाण्याची गरज नाही. फक्त महापालिकेच्या वेबसाईटवर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. ज्यांच्याकडे ई-पास आहे, त्यांनाच फिरता येईल. ई-पास नाही त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल अशी माहिती आयुक्त पि. शिवशंकर यांनी दिली.