सोलापूर - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाचा दुसरा टप्पा आज पार पडला. सोलापूर लोकसभा मतदारसंघात आज जवळपास ६० टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघांत सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५२ टक्के मतदान झाले असून एकूण ९२ ठिकाणी ६ वाजल्यानंतरही मतदानाची प्रक्रिया सुरूच होती. त्यामुळे अंतिम आकडेवारी यायला वेळ लागणार आहे.
लोकसभा मतदारसघात बंद पडलेल्या २९ ठिकाणच्या ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्या असल्याचीही माहिती राजेंद्र भोसले यांनी दिली. सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोहोळ तालुक्यातील अनगर येथील अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. काही ठिकाणी तांत्रिक दोषांमुळे मतदान युनिट वेळेत सुरू झाले नाहीत. ज्या ठिकाणच्या तक्रारी आल्या येथील युनिट बदलण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.