सोलापूर - येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा सोलापुरातील हेरिटेज मंगल कार्यालयात सुरू होता. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमाला आल्याबरोबर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माईक हातात घेऊन गर्दी करू नका, मास्क वापरा, सोशल डिस्टन्स ठेवा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. कार्यकर्त्यांनी गर्दी न करता बाहेरच्या प्रागंणात जाण्याचे आवाहन त्यांनी केले.
पाटील यांनी गर्दी कमी करण्याचे केले आवाहन -
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोलापुरात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नसल्याचे चित्र बघायला मिळाले. यावेळी जयंत पाटील हे मंचावर आले, तेव्हा त्यांनी समोर असलेली गर्दी पाहून स्वत: माईक हातात घेऊन कार्यकर्त्यांना गर्दी कमी करण्याचे आवाहन केले.
आजी माजी कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश -
हेरिटेज मंगल कार्यालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी इतर पक्षातील आजी माजी नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत होते. त्यामुळे या कार्यक्रमाला आजी माजी नेत्यांनी मोठी गर्दी केली होती.
मंचावर उपस्थित नेत्यांमध्ये देखील सामाजिक अंतर नाही-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या मेळाव्यात मंचावर देखील नेत्यांनी गर्दी केल्याचे चित्र बघायला मिळाले. जलसंपदामंत्री जयंत पाटील यासोबत, पालकमंत्री दत्ता भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक आबा साळुंखे, भारत जाधव, किसन जाधव, जुबेर बागवान, आदी नेते मोठ्या संख्येने व्यासपीठावर उपस्थित होते.