पंढरपूर - येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेचे पदाधिकारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेस जोडे मारून आंदोलन केले होते. पंढरपुरात संचारबंदी लागू असतानाही जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंढरपूर विभागाची जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
महाड येथील पत्रकार परिषदेमध्ये 23 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख अथवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्दाचा वापर केला होता. या शब्दाचा निषेध करण्यासाठी पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नारायण राणे यांच्या प्रतिमेस जोडो मारून पोस्टर जाळले होते. नारायण राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
हेही वाचा - जामिनावर सुटताच नारायण राणे यांचं रात्रीच्या 12.32 वाजता फक्त दोन शब्दांचं ट्वीट!
पंढरपुरात संचारबंदीच्या काळात शिवसेनेच्या वतीने कोरोना प्रादुर्भाव असतानाही आंदोलन केले. या आंदोलनामध्ये शिवसैनिकांकडून मास्क न वापरणे, सुरक्षित अंतर न ठेवणे अशा नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे, उपजिल्हाध्यक्ष सुधीर अभंगराव व शहर प्रमुख रवी मुळे यांच्यासह आठ ते दहा शिवसैनिकांनी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.