सोलापूर - पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज झालेल्या सौदे बाजारात विड्याच्या पानाला उच्चांकी 8 हजार 100 रुपये प्रती डाग असा दर मिळाला. दिवाळी आणि भाऊबिजेच्या मुहूर्तावर जुनवान पान बाजाराला प्रारंभ झाला.
सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पानाचे डाग विविध रंगी बेरंगी कागद आणि फुलांनी सजवून येथील बाजारात विक्रीसाठी आणले होते. मिरज तालुक्यातील सिध्देवाडी येथील पान उत्पादक शेतकरी आण्णासाहेब खांडेकर आणि रावसाहेब शिनगारे यांच्या जुनवान विड्याच्या पानाची सर्वाधिक बोली लावून येथील आडत व्यापारी समीर मोदी यांच्या लिलावात बाळकृष्ण देवकर यांनी 12 हजार पानांचा एक डाग 8 हजार 100 रुपयांना खरेदी केला.
सर्वाधिक बोलीने खरेदी केलेल्या व्यापाऱ्यांचा समीर मोदीच्या हस्ते रोख बक्षीस देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. आजच्या बाजारात सुमारे 300 डाप पानांची आवक झाली होती. दिवाळी सणामध्ये पानांना मागणी असल्याने बाजारात पानांचे दर वाढले आहेत.