पंढरपूर - सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी जोडणाऱ्या ओढ्याच्या पुलावरून दोन दिवसांपासून पाणी वाहत असून ग्रामस्थ व प्रवाशांचे पुलावरील पाण्यातून दळण-वळण सुरू आहे. पुलास संरक्षण कठडे अथवा अँगलचे गार्ड नसल्याने जीव मुठीत घेऊन सर्वजण ये-जा करताना दिसून येतात. त्यामुळे श्रीपत पिंपरी या गावचा संपर्क तुटला आहे. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसात सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पंढरपूर, सांगोला, माळशिरस, करमाळा तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी -
गेल्या पंधरा दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली होती. मात्र शनिवारी रात्री पावसाने सोलापूर जिल्ह्यात दमदारपणे हजेरी लावली यामध्ये पंढरपूर, करमाळा, सांगोला, माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनाही पंधरा दिवसानंतर मोठा दिलासा मिळाला आहे. पंढरपूर शहर व तालुक्यात सुमारे 234 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
हे ही वाचा - राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस; आणखी पावसाची शक्यता - हवामान विभाग
बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी गावातील पुलावर पाणी -
बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी जोडणाऱ्या ओढ्याच्या पुलावरून दोन दिवसांपासून पाणी वाहत असून. त्यामुळे गावातील नागरिकांना पाण्यातील ओढा पार करून तालुक्याचे ठिकाणी जावे लागत आहे. तालुक्यातील कुसळंब, बार्शीतील घोर ओढा, कासारवाडी, कोरफळे, अलीपूर, खांडवी येथील लहान-मोठ्या ओढ्यांतून पाणी श्रीपतपिंपरी येथील ओढ्याला येत असते. वाहत्या पाण्याच्या प्रवाहामुळे कित्येक वाहनांचे नुकसान होत आहे. नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे. तर होणाऱ्या जीवितहानीला प्रशासन जबाबदार राहणार का, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.