सोलापूर - कोरोना वॉरियर्स म्हणून काम करत असलेल्या घंटा गाडीवरील जवळपास 600 कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासून वेतनच मिळाले नाही. उपासमारीची वेळ त्यांच्या कुटुंबावर आली आहे. घंटा गाडीचा ठेका घेतलेला ठेकेदार 600 कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी करत आहेत.
शुक्रवारी (दि. 30 ऑक्टोबर) पालकमंत्री सोलापूर दौऱ्यावर असताना घंटा गाडी कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाया पडून वेतनाची मागणी केली. हे दृश्य बघणाऱ्यांचे डोळे पाणावले. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तत्काळ महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांना फोन लावून या घंटागाडी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे, असे आदेश बजावले.
मागिल चार महिन्यांपासून वेतन नाही
गेल्या दोन वर्षांपासून हीच परिस्थिती आहे. दरवेळी चार महिने किंवा सहा महिने वेतन थकवली जाते आणि अदा केली जाते. पण, टाळेबंदीपासून भयानक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चार महिन्यात एकही वेतन न मिळाल्याने भिक्षा मागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
ठेकेदार कंपनीविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा
मागील आठवड्यात समीक्षा कन्स्ट्रक्शन या कंपनीवर सदर बझार पोलीस ठाण्यात 58 लाखांचा भ्रष्टाचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सभागृह नेता व नगरसेवक सुरेश पाटील यांनी देखील जाहीर पत्रकार परिषद घेऊन समीक्षा कन्स्ट्रक्शन या कंपनीने सोलापूर महानगरपालिकेत 58 लाखांऐवजी 2 ते 3 कोटींचा कचरा घोटाळा केला आहे, अशी माहिती दिली. पण, याचा फटका घंटागाडीवर काम करणाऱ्या चालक आणि मजूर यांना सोसावा लागत आहे.
नोंदवहीत नावे पेनाने तर वेतनाचा आकडा पेन्सिलने
घंटा गाडीवरील कर्मचाऱ्यांच्या पेन्सिलने लिहिलेल्या मस्टरवर सह्या घेऊन पगार दिली जाते. नंतर खाडाखोड करून वेतनाच्या आकडेवारीमध्ये बदल केला जात आहे, हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. नाव आणि सह्या पेनाने होतात. वेतनाचा आकडा मात्र पेन्सिलने का लिहिला जातो, असा प्रश्न उपस्थित केले जात आहे. याबाबत काही कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराकडे काही विचारणा केली असता कामावरून काढून टाकू, अशी धमकी ठेकेदाराकडून दिली जात आहे.
साधारण 600 कर्मचारी कोरोना काळातही बजावताहेत आपले कर्तव्य
सोलापूर शहरात 8 झोन आहेत.प्रत्येक झोनमध्ये 25 ते 30 घंटा गाड्या वेगवेगळ्या प्रभागात कचरा उचलण्याचे कार्य करतात. एकूण 225 घंटागाड्या असून 250 चालक काम करत आहेत व 250 मजूर या गाड्यावर काम करतात. बदली चालकही या ठिकाणी काम करतात. सुरक्षा रक्षक म्हणून आठ जण आहेत, असे एकूण जवळपास 600 कर्मचारी कोरोना काळातही आपले कर्तव्य बजावत आहेत.
भविष्य निर्वाह निधी रक्कम वजा केली जाते पण पीएफ क्रमांक दिला नाही
प्रत्येक कर्मचाऱ्याला दिल्या जात असलेल्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीची रक्कम वजा केली जाते. पण, आजतागायत पीएफ क्रमांक दिला नाही, अशी तक्रार घंटा कर्मचारी करत आहेत.
वेतन पत्रक मिळत नाही
मागील अनेक वर्षांपासून घंटा गाडी कर्मचाऱ्यांना वेतन पत्रक (पगार स्लीप) दिली जात नाही. वेतन किती आहे, वजा किती होते याचा काहीही अंदाज कर्मचाऱ्यांना लावता येत नाही. आजतागायत कर्मचाऱ्यांना आद्याप वेतन पत्रक मिळालेले नाही.
आदेश 15 हजार 500 रुपयांचे पण प्रत्यक्षात मात्र 9 हजार
सोलापूर महानगरपालिकेच्या परिपत्रकावर घंटा गाडीवरील चालकांना 15 हजार 500 रुपये तर मजुरांना 13 हजार 500 रुपये मासिक वेतन अदा करण्याचे आदेश आहेत. पण, प्रत्यक्षात मात्र चालकांना 9 हजार 300 रुपये व मजुरांना 8 हजार 200 रुपये इतकेच वेतन दिली जाते. हा एक मोठा घोटाळा असल्याची माहिती घंटा गाडीवर काम करणाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा - एक दिवसाचा उपवास ठेवून स्टेशन मास्तरांकडून केंद्र सरकारच्या निर्णयाचा विरोध