सोलापूर - लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्ह्यात 50 हजारहून आधिक लोकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. गरजू आणि गरीब लोकांना लॉकडाऊनच्या कालावधीत आधार मिळावा, यासाठी शिवभोजन थाळी केंद्रे पुन्हा सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत 52137 तर आज 2246 लोकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
जिल्ह्यात एकूण 26 शिवभोजन केंद्रे आहेत. त्यापैकी पाच शहरात तर 21 ग्रामीण भागात आहेत. जिल्ह्यासाठी एकूण 3500 थाळींचे उद्दीष्ट आहे. आजपर्यंत शिवभोजन केंद्रामधून गरीब व गरजू लोकांना पुरविण्यात आलेल्या एकूण थाळींची संख्या 89558 अशी आहे, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरीब आणि गरजू लोकांना शिवभोजन थाळीचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात भाजीपाला, अन्नधान्य, गॅस इत्यादीचा नियमित पुरवठा सुरु आहे. खुल्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेले अन्नधान्य पुरेसे आहे, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील काही स्वस्त धान्य दुकानदारांविरुध्द तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा दुकानदारांविरुध्द परवाना रद्द करणे, अनामत रक्कम जप्त करणे, अशा कारवाई करण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही काही दुकानदारांविरुध्द तक्रारी येत आहेत. येथून पुढे या दुकानदारांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि अत्यावश्यक वस्तू कायदा या कायद्यानुसार गन्हा दाखल करण्यात येईल, असे मलिंद शंभरकर यांनी सांगितले.