सोलापूर - कोंडी या गावांमध्ये संभाजी ब्रिगेडच्यावतीने दीपावली सणाच्या बलिप्रतिपदानिमित्त समतावादी संस्कृतीचा सम्राट बळीराजाची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली.
शहरापासून जवळ असलेल्या कोंडी या गावात आज (सोमवार) सकाळी शेतकऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली. सुरुवातीला सजवलेल्या बैलगाडीत बळीराजा व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
बळीराजा असलेल्या शेतकऱ्याला आज आत्महत्या करावी लागत आहे. देशात पसरलेले जातीभेद, स्त्री-पुरूष विषमता, आर्थिक शोषण या सर्व घाणीचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी बळीराजाच्या क्रांतिकारी इतिहासापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे. सांस्कृतिक संघर्ष करावा लागेल. म्हणून बलिप्रतिपदेच्या निमित्ताने बळीराजाचे स्मरण करण्याची गरज आहे, असे मत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले यांनी व्यक्त केले.
यावेळी शहराध्यक्ष शाम कदम, अविनाश फडतरे, विकास सावंत, संजय भोसले, संतोष माशाळकर, भरत पाटील, गणेश पाटील, तानाजी भोसले यांसह कोंडी गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.