सोलापूर - इच्छाशक्ती अन् जिद्द उराशी बाळगत प्रयत्नांची पराकाष्ठा केली की काहीच अशक्य नसते. याचा प्रत्यय माढा तालुक्यातील उपळाई(खुर्द)ची कन्या अनिता दादा हवालदार (वय २६) हिने कृतीतून दाखवून दिले आहे. अनिताने दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
अनिता ही दादा हवालदार व सुनिता हवालदार या शेतकरी दामपत्यांची लेक असून ती यावर्षी घेतल्या गेलेल्या कायद्याच्या परीक्षेत यशस्वी ठरली आहे. लोकसेवा आयोगामार्फत सप्टेंबर २०१९ मध्ये न्यायाधीश पदाकरता मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आयोगाने शनिवारी रात्री सायंकाळी ६ वाजता जाहीर केला. यामध्ये राज्यातील १९० विद्यार्थी या पदासाठी पात्र ठरले. त्यात अनिताने पहिल्या क्रमांकावर आपली वर्णी लावली आहे. उपळाई सारख्या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अनिताची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून निवड झाली असून अनिता ही गावातील पहिली महिला क्लासवन अधिकारी ठरली आहे.
हेही वाचा - रुक्मिणी मातेला अर्पण केलेल्या साड्या घेण्यासाठी महिलांची गर्दी; विक्री सेलचे आयोजन
अनिताचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण चिखलठाण येथील जि.प.प्राथमिक शाळेत झाले. तर, माध्यमिक शिक्षण उपळाई खुर्द आणि अकरावी-बारावी विज्ञान शाखा के.बी.पी कॉलेज पंढरपूर येथून झाले. नंतर तिने सोलापुरच्या दयानंद महाविद्यालयातुन एल.एल.बी आणि एल.एल.एम ची पदवी घेतली. यानंतर अनिता ने सोलापूर व पुणे येथून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. आणि दुसऱ्याच स्पर्धा परीक्षेत प्रयत्न अन् जिद्दीच्या जोरावर तिने हे उत्तुंग यश मिळवले. अनिताच्या निवडीमुळे उपळाईकराची मान अभिमानाने उंचावली आहे.
हेही वाचा - मुंबई-पुणे दरम्यानचा रेल्वेचा 'तो' मार्ग पुन्हा येतोय रुळावर
अनिताचे आई-वडील शेतातून पिकांची लागवड करुन उत्पन्न घेतात. त्याचबरोबर वडील व अनिताचा भाऊ अमोल हा दुग्ध व्यवसाय करून कुटुंबाला उभारी देत अनिताचा अभ्यास व परीक्षेचा खर्च भागवत आले होते. आजचा दिवस माझ्यासाठी सर्वोच्च आनंदाचा ठरला आहे. प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते तेच स्वप्न माझ्या मुलीने अथक परिश्रमातुन पुर्ण केले. आमच्या कष्टांचे चीज झाले अशी प्रतिक्रिया अनिताचे वडिल, दादा व आई सुनिता यांनी दिली. तर, तरुणाईने मोबाईलपासून व समाज माध्यमांपासून अभ्यास करताना गुरफटू नये. स्वप्न मोठे बघून ते सत्यात उतरवण्यासाठी अभ्यासात सातत्य, सकारात्मक विचार सोबतीला हवेत असे अनिता आपल्या यशाबाबत सांगताना म्हणाली.
हेही वाचा - पंढरपूरच्या विठ्ठलाला पुसदचे दान; भाविकाकडून दहा तोळे सोने अर्पण