सोलापूर - देव तारी त्याला कोण मारी, अशी अद्भूत घटना सोलापुरातील मार्कंडेय रुग्णालयात घडली आहे. चौदा वर्षीय करण पवार हा एका कारखान्यात काम करत असताना, कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकल्याची घटना घडली होती. हा अपघात इतका विचित्र होता की, करण पवारच्या छातीच्या डाव्या बाजूला कन्व्हेअर बेल्टने फाडून टाकले. फुफ्फुस, हृदय अक्षरशः डोळ्याने दिसत होते. तरीही डॉक्टरांनी हार न मानता त्याच्यावर वेळीच शस्त्रक्रिया करून काही तासांतच करणला जीवनदान दिले.
करणचा भयानक अपघात
21 मार्च, 2021 रोजी देविचामाळ (ता. करमाळा) येथील एका कारखान्यात करण पवारचा कन्वेअर बेल्टमध्ये अडकून अनावधाने अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की करणची डावी छाती पूर्णपणे फाटली. उघड्या डोळ्याने फुप्फुस व हृदय दिसत होते. हृदयाचे ठोकेही स्पष्ट दिसत होते.
मार्कंडेय रुग्णालयात ताबडतोब डॉक्टरांची टीम तयार करून शस्त्रक्रिया केली
करण पवारला सोलापुरातील मार्कंडेय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हृदय फुफ्फुस शल्य विशारद डॉ. विजय अंधारे हे तत्काळ रुग्णालयात दाखल झाले. करणला दुपारी एक ते दिड वाजण्याच्या सुमारास त्याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रियेची तयारी करण्यात आली. करणच्या छातीमधील फुफ्फुस बंद पडले होते. ते व्हेन्टिलेटरच्या आधारे फुगवण्यात आले. फुफ्फुसातून जी हवा जात होते ती बंद करण्यात आली. हृदयाचे आवरण दिसत होते. हृदयाच्या नसा उघड्या पडलेल्या होत्या. त्यातून रक्तस्त्राव होत होता. ते सर्व बंद करण्यात आले. त्यानंतर छातीची मोडलेली हाडे एकमेकांच्या जवळ आणून बसवण्यात आली. हृदय आणि फुफ्फुसावर शस्त्रक्रिया करण्यात आली..
करणला डिस्चार्ज देखील मिळाले
दोन दिवसानंतर करण पवारला अतिदक्षता विभागमधून सर्वसामान्य वॉर्डात हलविण्यात आले. करण आता व्यवस्थित उपचार घेत आहे. सध्या त्याला डिस्चार्ज देखील देण्यात आले आहे. या शस्त्रक्रियेत भुलतज्ज्ञ मंजुनाथ डफळे तसेच सहकारी ममता मुंगा पाटिल, मुबिना शेख, नजमा शेख, केशव मेरगु, बाळकृष्ण कोटा, दिव्या मडता, सुमित माने, नागमनी मडता यांचे सहकार्य मिळाले.
हेही वाचा - पंढरपूर पोटनिवडणूक : भाजपकडून समाधान आवताडे तर राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांचे अर्ज दाखल
हेही वाचा - सोलापूर : भाजी विक्रेत्यांकडे कोरोना निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक