पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. त्यातच आता राज्यातील नेत्यांनीही प्रचारसभेत जोर लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उद्यापासून प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहे. भाजप नेते कल्याणराव काळे अजित पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश घेणार आहे.
प्रस्थापित उमेदवारांकडून आरोपांची चिखलफेक
भाजप उमेदवार समाधान औताडे यांच्या प्रचाराची धुरा आमदार प्रशांत परिचारक यांच्या खांद्यावर आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराची सूत्र आमदार संजय शिंदे यांच्याकडे दिली आहे. दोन्ही उमेदवारांच्या प्रचार प्रमुखांकडून टीकेचा भडीमार केला जात आहे. भाजप व राष्ट्रवादी कडून एकमेकांवर प्रचाराच्या माध्यमातून चिखलफेक होताना दिसत आहे. त्यातही स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील, अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर औताडे व अपक्ष उमेदवार शैलजा गोडसे यांच्याकडून विकासाच्या मुद्द्यांवरून जोरदार प्रचार सुरू केला आहे. यामुळे प्रस्थापित उमेदवारांना कडवे आव्हान मिळत आहे.
भाजप नेते कल्याणराव काळे यांचा प्रवेश
भाजप नेते व चंद्रभागा सहकारी कारखान्याचे कल्याणराव काळे हे अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश घेणार आहेत. कल्याणराव काळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशामुळे भगीरथ भालके यांना फायदा होणार आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या दोन दिवसात सात सभा
महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंढरपूर येथील मंगळवेढा तालुक्यामध्ये दोन दिवसात सुमारे ७ सभा घेणार आहेत. पंढरपूर तालुक्यातील गादेगाव, खर्डी, कासेगाव तर मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथे अजित पवार हे प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. त्यानंतर हुलजांती, नांदेश्वर, लक्ष्मी टाकळी याठीकाणी सभा होणार आहेत. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आ. संजय शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील नेते उपस्थित राहणार आहे. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सभेमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांना चांगले बळ मिळणार आहे.