सोलापूर - शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये ग्राहकांनी आज दसऱ्यानिमित्त खरेदीसाठी गर्दी केली होती. ग्राहकांनी यावेळी ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक, सोने, कपडे अशा विविध वस्तुंची खरेदी केली. आज सोलापूरमधल्या बाजारपेठांमध्ये तब्बल 150 कोटींच्या घरात उलाढाल झाली आहे. कोरोनामुळे घोषीत करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी खरेदी केली.
मात्र ग्राहकांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केल्याने काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. शहरातील सात रस्ता, सराफ बाजार, बाळी वेस, टिळक चौक, नवी पेठ, बेगम पेठ, कन्ना चौक, सरस्वती चौक, विजापूर रोड परिसर अशा प्रमुख ठिकाणी ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. दरम्यान यावर्षी चारचाकी वाहने घेण्याकडे ग्राहकांचा कल दिसून आला. आज दसऱ्याच्या मुहूर्तावर 500 पेक्षा अधिक चारचाकी वाहनांची विक्री झाल्याची माहिती समोर येत आहे.
* दसऱ्यानिमित्त दुकानदारांकडून ग्राहकांना आकर्षक सूट
* कोरोनाच्या संकटातही बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी
* टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, टू व्हीलर आणि चारचाकींची मागणी वाढली
*शहरातील नवी पेठ, सराफ बझार, बाळीवेस परिसरातील व्यापाऱ्यांनी केली दुकानांची आकर्षक सजावट