सोलापूर - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज प्रचंड गदारोळ झाला. गेल्या अनेक दिवसांपासून महापालिकेच्या अर्थसंकल्पाची फक्त चर्चा केली जात आहे. मात्र त्याला अंतिम स्वरूप येत नसल्याने काँग्रेस आणि बसपाचे नगरसेवक आज संतप्त झाले. आज सभेच्या वेळी जाब विचारावा म्हणून हे नगरसेवक आले. मात्र महापौरांनी दुखवटा प्रस्ताव मांडून सभा तहकुबीची घोषणा केली.
महापौरांच्या या निर्णयाने सभागृहात गोंधळ वाढला. यावेळी काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी तर महापालिकेच्या मुख्य सभागृहाला बाहेरून चक्क कुलूप ठोकले.
यावेळी पदाधिकारी आणि नगरसेवक सभागृहांमध्ये काही काळ अडकून पडले. तर दुसरीकडे पालिकेच्या समोर वंचित आघाडीचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. विकासापासून वंचित अशा आशयाचे फलक गाढवांच्या गळ्यात अडकवून यावेळी घोषणाबाजी करण्या आली.
नगरसेविका श्रीदेवी फुलारे आणि आनंद चंदनशिवे यांनी केवळ सभागृहाचा नव्हे, तर शहराचा अवमान केला आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष शिवसेनेने केली आहे. तर महापौर शोभा बनशेट्टी यांनी अर्थसंकल्प हा जनताभिमुख असावा, यासाठी सत्ताधारी आणि विरोधी शिवसेना यांच्या मागणीप्रमाणे आणखी काही काळ वेळ दिला आहे.
अर्थसंकल्प मंजूर होणारच
येत्या दोन दिवसात यावर निर्णय होईल, असे आश्वासन देत त्यांनी वेळ मारून नेली. दरम्यान महापालिकेच्या सभागृहांमध्ये गदारोळ वाढल्याने पालिका परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.