सोलापूर - प्रसिद्धीसाठी कुठलाही गाजावाजा न करता आधी केले मग सांगितले, या उक्तीप्रमाणे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने नेहमी विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून सोलापुरात रविवारच्य भल्या सकाळी 'श्री' परिवाराच्या सदस्यांनी म्हणजेच दासांनी स्मशानभूमीची स्वच्छता मोहीम राबवली. या स्वछता मोहिमेत तब्बल 140 टन कचरा जमा केला आहे.
राज्यात बैठक परिवाराच्या माध्यमातून सर्व श्री सदस्यांना या स्वच्छता मोहिमेविषयी सांगण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर शहरातील सर्व स्मशानभूमीत आणि कब्रस्तानांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले. डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीतली काटेरी झुडपे काढण्यात आली. पालापाचोळा, प्लास्टिक कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली.
या कार्यासाठी शहरातील स्मशानभूमीत चार हजारपेक्षा जास्त श्री सदस्य सहभागी झाले होते. या सर्वांनी जवळपास 140 टनांपर्यंत शहरातील कचरा गोळा केला. महानगरपालिकेच्या वाहनातून आणि प्रतिष्ठानच्या वाहनातून हा कचरा उचलून डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात आला.
या ठिकाणी झाली स्वच्छता मोहीम -
बाळे स्मशानभूमी, देगाव, रूपाभवानी मंदिराजवळील हिंदू स्मशानभूमी, मुस्लिम कब्रस्तान, मारवाडी समाज जुना पुणे नाक्याजवळ, जुना कारंबा नाका, मोदी स्मशानभूमी व कब्रस्तान पद्मशाली स्मशानभूमी. व्हीआयपी रोडवरील मुस्लिम कब्रस्तान.
शहरातील सर्व बैठकींच्या माध्यमातून श्री सदस्यांची यादी केली जाते. त्यातून विभागवार स्वच्छतेचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार दासांना स्मशानभूमींची विभागणी करून देण्यात आली होती.