मुंबई - फॉसिल्स बास गिटारवादक चंद्रमौली बिस्वास यांचं निधन झालं आहे. १२ जानेवारी रोजी कोलकाता येथील इंडियन मिरर स्ट्रीट येथील त्यांच्या भाड्याच्या घरात त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. सुरुवातीच्या तपासानंतर पोलिसांनी सांगितलं की चंद्रमौली नैराश्यानं ग्रस्त झाले होते. गेल्या काही वर्षांपासून काम नसल्यामुळे ते आर्थिक संकटाचा सामना करत होते. यासाठी ते वैद्यकीय उपचार घेत असल्याचंही यानिमित्तानं उघड झालंय. चंद्रमौली यांचे जवळचे मित्र रुपम यांनी त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. काल १२ जानेवारी रोजी कल्याणी येथील बंगाल सांस्कृतिक महोत्सवाला गेले असताना रूपम यांना ही बातमी समजली.
चंद्रमौली यांच्या मृत्यूची बातमी फॉसिल्स बँडच्या सदस्यांनाही नादिया जिल्ह्यातील कल्याणी येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना कळली. बँडची मुख्य गायक रूपम इस्लाम आणि इतर सदस्य जेव्हा स्टेजवर पोहोचलेले तेव्हा ते खूप दुःखी दिसत होते.
प्रेक्षकांनाशी बोलताना रूपम म्हणाले, "आम्ही या मंचावर २१ वेळा सादरीकरण केलं आहे. यापैकी १६ वेळा, आमच्याबरोबर असलेल्या प्रिय व्यक्तीचा फोटो आमच्या मागे स्क्रीनवर आहे. आम्ही इथे आलो तेव्हा गाडीत एक बातमी समजली आणि ती बातमी आमच्या हृदयात विजेसारखी घुसली. अशा परिस्थितीत कोणीही गाऊ शकत नाही. कोणतेही वाद्य वाजवता येत नाही. पण बंगाली रॉक क्राउड आपल्यासमोर आहे. चंद्रा बराच काळ आमचा सोबती होता. तो माझा सर्वात चांगला मित्र होता हे आज मला सांगायला अजिबात संकोच वाटत नाही. आम्ही गेल्या वर्षीपर्यंत एकमेकांच्या संपर्कात होतो."
चंद्रमौली बिस्वास २००० ते २०१८ पर्यंत 'फॉसिल्स' बँडशी संबंधित होते. सुरुवातीला ते गिटारवादक म्हणून सामील झाले, पण नंतर ते प्रामुख्यानं बास गिटार वाजवत असत. काही शारीरिक समस्यांमुळे २०१८ मध्ये त्यांनी हा बँड सोडला. यानंतर त्यांनी 'गोलक' नावाचा एक गट स्थापन केला. 'गोलक' टीमच्या सदस्यांना त्यांच्या टीममेटच्या निधनानं खूप दुःख झालं आहे.