सोलापूर : दक्षिण सोलापूरचे भाजप आमदार सुभाष देशमुखांनी मंद्रुप पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना भर सभेत फोन लावून मला दारुबंदीच्या आरोपातून मुक्त करा, अशी विनंती केली. आमदार म्हणाले की, गावातील नागरिक अवैध हातभट्टी व दारू विक्रीला मला जबाबदार धरत आहेत. बोळकोटे गावातील महिलांनी मला निवेदन देत दारूबंदी केल्याशिवाय गावातून जायचं नाही, अशी भूमिका घेतली होती. आता या प्रकरणी तडक कारवाई करत मला या आरोपातून मुक्त करा, अशी विनंती त्यांनी पोलीस निरीक्षकांना केली.
आमदारांनी मंचावरून लावला कॉल : भाजप आमदार सुभाष देशमुख आज रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी दक्षिण सोलापूर मतदारसंघात आले होते. या कार्यक्रमादरम्यान बोळकोटे गावातील महिलांनी गावात दारूबंदीची मागणी केली. त्यांनी भाजपा आमदारांना निवेदन देत पोलीस प्रशासनास कारवाईचे आदेश द्या, अन्यथा गावातून जाऊ नका, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर आमदार सुभाष देशमुख यांनी कार्यक्रमादरम्यान भाषण करताना मंचावरून मंद्रुप पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना फोन लावला. गावातील महिलांनी दारू बंदीची मागणी केली आहे. या प्रकरणी तुम्ही कारवाई करा, अशी मागणी त्यांनी पोलीस निरीक्षकांना केली. सुभाष देशमुख म्हणाले की, 'बोळकोटे गावातील नागरिक माझ्यावर आरोप करत आहेत. तुम्ही गावातील दारू विक्रेत्यांवर कारवाई करा व या आरोपातून मला मुक्त करा.'
पोलीस निरीक्षकांनी दिले कारवाईचे आश्वासन : याला उत्तर देताना मंद्रुप पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणाले की, 'मंद्रुप पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकही हातभट्टी दारूचा पॉईंट नाही. आम्ही अवैधरित्या हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच बाहेरून आणलेली हातभट्टी दारू जप्त करून विक्रेत्यांवर कडक कारवाई करत आहोत.'
हे ही वाचा :