पंढरपूर (सोलापूर) - राज्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची झळ पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक नेत्यांनाही बसत आहेत. भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपाच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहे. त्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसणार आहे. याबाबतची माहिती त्यांनी फेसबुक माध्यमातून दिली आहे.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर प्रचाराची जबाबदारी
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराची जबाबदारी असणाऱ्या मुख्य नेत्यांपैकी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील एक आहेत. 4 एप्रिलपासून आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मंगळवेढा, पंढरपूर तालुक्यात प्रचाराचा झंझावात सुरू केला होता. पोटनिवडणुकीमध्ये बैठका, सभा, कॉर्नर सभा याचा धडाका मोहिते पाटील यांनी लावला होता. अवताडे यांच्या प्रचारातील मुख्य शिलेदार असणाऱ्या मोहिते-पाटील यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे भाजपाचा गोची वाढल्याचे बोलले जात आहे.
फेसबुकची माध्यमातून दिली माहिती
'माझी कोरोनाची टेस्ट आज पाॅझीटीव्ह आली आहे. त्यामुळे मी विलगीकरणमध्ये आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की, आपणही आपली कोरोनाची टेस्ट करुन घ्यावे. स्वतःची काळजी घ्या.' अशी माहिती मोहीते पाटील यांनी दिली आहे.
भाजप उमेदवारांची धाकधूक वाढली
भारतीय जनता पार्टीसाठी पंढरपूर मंगळवेढा निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यात भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते प्रचारात सहभागी होऊ शकणार नाही. भाजप उमेदवार समाधान आवताडे, आमदार प्रशांत परिचारक यांनी मोहिते पाटील यांच्यासोबत प्रचार सभेत सहभागी झाले होते. त्यामुळे आता भाजपा उमेदवारांची धाकधूक वाढल्याच बोलल्या जात आहे.
हेही वाचा-नाशिकच्या संभाजी स्टेडियमचे कोविड सेंटरमध्ये रुपांतरण; महापालिका आयुक्तांनी केली पाहणी