सोलापूर - शेतातील बांधावरून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी भीमराव बब्रुवान यादव (वय 24, रा. शिरवळ, ता. अक्कलकोट) यास पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्याने भीमराव कोंडिबा पवार यांचा शेतीच्या वादातून खून करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप सिद्ध झाला आहे.
तंटामुक्ती अध्यक्षासमोरच खुनी हल्ला
29 मे 2016रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शेतीच्या बांधावरून तक्रार मिटवण्यासाठी बैठक आयोजित केली होती. ही बैठक गावच्या तंटामुक्ती अध्यक्षांनी आयोजित केली होती. तक्रार मिटवण्यासाठी विनोद भीमराव पवार आणि भीमराव कोंडिबा पवार शेतात जाऊन थांबले होते. या बैठकीत बब्रुवान गुंडा यादव, भीमराव बब्रुवान यादव, मंगला बब्रुवान यादव हेदेखील आले होते. तंटामुक्त अध्यक्ष अप्पशा दरेकर हे शेतीचे वाद मिटवण्यासाठी चर्चा करत होते. यावेळी आरोपी भीमराव बब्रुवान यादव याने भीमराव पवार यांना शिवीगाळ केली आणि संपवतो, अशी धमकी दिली. हा वाद वाढत जाऊन भीमराव यादव याने भीमराव पवार यांना चाकूने पोटावर व छातीवर वार करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन येथे विनोद भीमराव पवार (जखमीचा मुलगा) याने फिर्याद दिली होती. त्यानुसार भा. दं. वि. 307, 323, 506प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
तपासले एकूण 7 साक्षीदार
सदर खटल्याची संपूर्ण सुनावणी झाली. यामध्ये एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले. मुख्य साक्षीदार म्हणून जखमी भीमराव पवार यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. कोर्टात पुरावे सादर करताना परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकीय पुरावा हे देखील महत्त्वपूर्ण ठरले. जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आज गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी भीमराव बब्रुवान यादव (वय 24) यास पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. आरोपीच्या वतीने अॅड. डी. माने यांनी तर सरकार पक्षाच्या वतीने अॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी काम पाहिले.