सोलापूर - लॉकडाऊनंतर तब्बल 72 दिवसांनी सोलापूर शहरातील निम्मी दुकाने उघडली आहेत. 5 जूनपासून बाजारपेठेतील एक दिवसआड करून एका बाजूची दुकाने उघडायला शासनाने परवानगी दिली आहे. त्यानंतर आज सोलापुरातील नवी पेठेसह प्रमुख बाजार पेठेतील एका बाजूची दुकाने उघडली आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. त्यानंतर सोलापूर शहरातदेखील लॉकडाऊनंतर संपूर्ण बाजारपेठा बंद होत्या. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतेही दूकान सुरू नव्हते. त्यानंतर आता शासनाने काही नियमावली करून दूकान सुरू करण्याला परवानगी दिली आहे. त्यामध्ये एक दिवसआड बाजारपेठेतील एका बाजूची दुकाने आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजूचे दुकाने उघडायला परवानगी दिली आहे. आज सोलापूर शहरातील नवी पेठ, दत्त चौक, मधला मारूती चौक, टिळक चौक, कौतम चौक या शहरातील महत्वाच्या बाजार पेठेतील निम्मी दूकान उघडण्यात आली आहेत.
तब्बल 72 दिवसानंतर दुकाने उघडण्यात येत असल्यामुळे दुकानातील साफ सफाई करण्यातच आज व्यावसायिकांचा बराच वेळ गेला आहे. सकाळी दुकाने उघडल्यावर प्रत्येक दुकानात मोठ्या प्रमाणावर साफ सफाईचे काम सुरू होते. तसेच सॅनिटायझर करून घेण्याचे काम देखील सुरू होते. पहिला दिवस असल्यामुळे बाजारात ग्राहकांची तूरळक प्रमाणात गर्दी दिसत होती.