सोलापूर - सोलापूर पुणे महामार्गावरील बाळे पुलाजवळ रविवारी रात्री मोठा अपघात झाला. यामध्ये पंढरपूर तालुक्यातील तुंगत या गावातील सारंग प्रकाश रणदिवे (वय 30) आणि संजय विठोबा अमंगे (वय 30) हे दोघे ठार झाले आहेत.
सोलापुरातील काम आटोपून हे तरुण तुंगतकडे कार ने निघाले होते. पण बाळे या गावाजवळ त्यांची कार पंक्चर झाली. रात्री 11 च्या सुमारास कार पंक्चर झाल्याने पंक्चरची सर्व दुकाने बंद होती. नाईलाजास्तव त्यांना स्वतः पंक्चर काढावे लागले. पण महामार्गावर थांबून पंक्चर काढणे अतिशय धोकादायक होते. तरी देखील त्यांनी हिम्मत करून पंक्चर काढण्यास सुरुवात केली.
कंटेनर चालकाने घटनास्थळवरून धूम ठोकली-
मात्र, 11 च्या सुमारास एक भला मोठा कंटेनर त्या दोघांचा मृत्यू बनून आला. कंटेनर चालकाने रात्रीच्या अंधारात दोघा तरुणांना पहिलेच नाही. त्याने तरुणांना धडक देत फरफटत नेले. काही अंतरावर जाऊन कंटेनरची चाके जाम झाली. चालकाने खाली उतरून बघितल्यावर त्याच्या लक्षात आले. दोन जण आपल्या वाहनाखाली चिरडले आहेत. हे माहीत झाल्यावर कंटेनर चालकाने घटनास्थळावरून धूम ठोकली.
अपघाताची माहिती महामार्गावरील काही उपस्थितांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतांना शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी दाखल केले. दरम्यान, कंटेनर ताब्यात घेतला आहे. या घटनेची नोंद सिव्हील पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
हेही वाचा- वणी तालुक्यात माय-लेकाची आत्महत्या, विष प्राशन केल्याचा संशय