सोलापूर - सातबारा उतारा दुरुस्त करून मिळावा यासाठी पंढरपूर येथील एका शेतकऱ्याने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथील टॉवरवर चढून आत्महदरनाचा प्रयत्न केला आहे. यावेळी पोलिसांनी अग्निशामक दलाच्या जवानांना बोलावून त्याला खाली उतरवले. राज्य गुप्तवार्ता विभागातील पोलीस उपनिरीक्षक यांनी शेतकऱ्याचे मनपरिवर्तन करून त्यांना खाली उतरवण्यास सांगितले. कुबेर चिमाजी घाडगे(रा देगाव, ता पंढरपूर, जि सोलापूर) असे आंदोलनकर्त्या शेतकऱ्याचे नाव आहे.
'सात बारा उताऱ्यावर चुकीच्या नोंदी झाल्या'
कुबेर चिमाजी घाडगे या शेतकऱ्याच्या शेतातील उताऱ्यावर चुकीच्या नोंदी झाल्या आहेत. अशी, तक्रार त्याने टॉवरवर चढून व्यक्त केली. अनेकवेळा तहसील कार्यालयात जाऊन या नोंदी कमी कराव्यात अशी मागणी केली होती. पण, त्याची मागणी मान्य न झाल्याने, आज मंगळवारी त्याने टोकाचे पाऊल उचलत टॉवरवर चढून आंदोलनास सुरुवात केली. तसेच, या शेतकऱ्याकडे यावेळी विषारी औषधही होते. मागणी मान्य न झाल्यास टॉवरवर बसून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करणार असल्याचा इशारा शेतकऱ्याने यावेळी दिला आहे.
आंदोलन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील टॉवर
खाजगी सावकाराच्या जाचास कंटाळून या शेतकऱ्याने आंदोलन केले होते. त्यावेळेस जिल्हा प्रशासनाने टॉवरच्या आजूबाजूला तारेचे कुंपण बांधले होते.आज मंगळवारी (24 ऑगस्ट)रोजी पुन्हा एका शेतकऱ्याने शेताच्या सातबारा उताऱ्यावरील नोंदी दुरुस्त करून मिळाव्यात अशी मागणी करत टॉवरवर चढून आंदोलन केले. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील टॉवर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.