सोलापूर - पैशांची गरज भासवून सोनार, बँका, पतसंस्थांकडे बनावट सोने गहाण ठेवून लाखोंची फसवणूक करणारे एक रॅकेट सोलापूर ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणले आहे. सोलापुरातील मोहोळ तालुका पोलीस ठाण्यात यांसदर्भात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. आतापर्य़ंत 9 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर त्यापैकी 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
अशी आहेत आरोपींची नावे
बनावट सोने गहाण ठेवून फसवणूक केल्याची तक्रार एका सराफा व्यापाऱ्याने मोहोळ पोलीस ठाण्यात केली होती. याप्रकरणी तपास सुरू असताना पोलिसांना याच्यामागे एक मोठे रॅकेट असल्याचे लक्षात आले. दिल्लीतून पुण्यापर्यंत कुरिअरद्वारे आणि त्यानंतर एजंटमार्फत हे सोने मोहळ तालुक्यातील सावळेश्वरमध्ये आणल्याचे तपासातून समोर आले. याप्रकरणी पप्पू उर्फ दावल तांबोळी, ईस्माईल मनियार, मनोज बनगर (रा. सांगली), बळीराम यादव (रा. माढा), बबलू उर्फ इसाक पठाण, बबलू उर्फ सद्दाम तांबोळी, नवनाथ सरगर (रा. कोल्हापूर), योगेश शर्मा (रा. सांगली) यांच्यासह अन्य काही अज्ञात आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनसाखळीवरून रॅकेटचा पर्दाफाश
मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथील एका सराफा दुकानात आरोपी पप्पू उर्फ दावल तांबोळी याने पैशांची गरज आहे म्हणत सोनसाखळी गहाण ठेवली होती. त्यानंतर काही दिवसांनी तांबोळी पुन्हा दुसरी सोनसाखळी घेऊन त्याच दुकानात गेला. त्याही वेळी सोनाराने तांबोळी याची सोनसाखळी गहाण ठेवून घेतली आणि त्याला पैसे दिले. मात्र पुन्हा एकदा संशयीत आरोपी पप्पू तांबोळी यांने सोनसाखळी गहाण ठेवण्यासाठी आणल्यानंतर सोनाराला शंका आली. त्यांनी या सोनसाखळीची सोलापुरात तपासणी केली असता सोनसाखळी बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
बँका, पतसंस्था आणि सोने व्यापाऱ्यांची फसवणूक
आरोपी पप्पूने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील अन्य दोघांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जिल्ह्यातील विविध बँका, पतसंस्था आणि सोने व्यापाऱ्यांची फसवणूक आरोपींनी केल्याचे समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास करत असताना काही धागेदोरे ही सांगलीत असल्याचे देखील पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार मोहोळ पोलिसांची एक टीम सांगलीत पोहोचून योगेश शर्मा याच्याकडून कोट्यवधी रुपयांचे सोने पोलिसांनी हस्तगत केले आहे. यामध्ये सोलापूर ग्रामीण पोलिसांनी 900 ग्रॅमहून अधिक वजनाचे सोने आणि साडेसहा किलोहून अधिक वजनाची चांदी पोलिसांनी हस्तगत केली आहे. ताब्यात घेतलेल्या या सोन्या-चांदीचा अधिक तपास सुरू आहे. हे सोने देखील बनावट आहे किंवा कर चुकवून आणण्यात आले आहे. याचा शोध पोलीस घेत आहेत.