सोलापूर - जिल्ह्यातून आंतरजिल्हा आणि आंतरराज्य मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या राज्याच्या सीमेवरील 179 मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आले असून फक्त 30 मार्गांचा वापर हा अत्यावश्यक सेवेसाठी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागातून आंतरजिल्हा आंतरराज्यात जाणारे एकूण 212 मार्ग आहेत. यापैकी 179 मार्ग हे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. या मार्गावरून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा दुसऱ्या राज्यात कोणालाही जाता येणार नाही. या रस्त्यावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. फक्त 30 मार्गावरून अत्यावश्यक सेवेची वाहतूक केली जाणार आहे. ज्यांना कोणाला पर-जिल्ह्यात किंवा पर-राज्यात अत्यावश्यक कामासाठी जायचे असेल त्यांनी जिल्हा ग्रामीण पोलिसांसाकडून ऑनलाईन अर्ज करून परवानगी घेणे अत्यावश्यक असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 36 अन्वये जिल्ह्यात हे 179 रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणचे व गावातील रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्याठिकाणी अतिरिक्त सुरक्षा देण्यात आली आहे. बंद केलेल्या रस्त्याच्या ठिकाणी त्या गावातील किंवा बाजुच्या गावातील दोन तरूणांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. अशा विशेष पोलीस अधिकाऱ्यांना ओळखपत्र, शिट्टी, मास्क, हॅन्ड सॅनिटायझर आणि प्रतिदिन 125 रूपये कर्तव्य भत्ताही देण्यात येणार असल्याचे सोलापूर ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.