सोलापूर - सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस निरीक्षकासह 14 जणांना कोरोची लागण झाले असल्याची माहिती सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांना त्यांच्या कुटुंबीयांसह विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील 2 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यानंतर या पॉझिटिव्ह पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या इतर पोलिसांची कोरना चाचणी केली असता, 9 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. या 9 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासह विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
आतापर्यंत सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील 14 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये एका पोलीस निरीक्षकाचाही समावेश आहे. तर कोरोनाची लागण झालेल्या सर्व पोलिसांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले आहे.