पंढरपूर - सोलापूर जिल्ह्यातील 657 ग्रामपंचायत निवडणुकीच्या 5 हजार 877 जागासाठी 12 हजार 225 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यापैकी 70 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. आशिया खंडात सर्वांत मोठी समजली जाणाऱ्या अकलूज ग्रामपंचायतीची एक जागा बिनविरोध झाली आहे. उर्वरित 16 जागांसाठी 47 उमेदवारांनी दंड थोपटले आहे. यंदा अकलूजची निवडणूक नगरपरिषद होण्यासाठी घातलेल्या बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर लागली आहे.
सोमवारी अर्ज माघारी घेण्याची अखेरची मुदत होती. अनेक ग्रामपंचायतींसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज माघारी घेण्यात आल्याने निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. बहुतांश ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील 657 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तब्बल 20 हजार 952 अर्ज दाखल दाखल करण्यात आले होते. त्यात शेवटच्या दिवशी 8 हजाराहून अधिक जणांनी माघार घेतली आहे.
657 ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये 70 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या. त्यात माढा तालुक्यातील निमगाव (टे) ही ग्रामपंचायत सलग 67 वर्षे बिनविरोध राहली. माळशिरस तालुक्यातील चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. या चार ग्रामपंचायतींच्या मिळून 40 व अन्य 18 ग्रामपंचायतींच्या मिळून 50 अशा तालुक्यातील एकूण 90 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. बार्शीत 96 ग्रामपंचायतपैकी 14 ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक करण्यात आली. तर मोहोळ येथील 76 ग्रामपंचायत पैकी 13 ग्रामपंचायत कारभाऱ्यानी बिनविरोध निवडून येण्याचा पण पूर्ण केला. त्यात माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर या ग्रामपंचायतचा ही समावेश आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 657 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आजपासून गावोगावी प्रचाराचा धुरळा उणार असून सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक इच्छुकांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. मात्र सरपंचपदाचे आरक्षण निश्चित नसल्याने काही गावांनी जरी अविरोध निवडी केल्या असल्या तरी सरंपचपदाचे आरक्षण व त्यानंतर कोणाची निवड करायची यावरुन पुन्हा एकदा वाद होण्याचीही अनेक गावांत शक्यता निर्माण झाली आहे. काही गावांनी सरळ दोन गटांत पॅनेल तयार करुन निवडणुकीस सामोरे जाणेच पसंत केले आहे.
हेही वाचा - करमाळा तालुक्यात अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीमध्ये तूर जळून खाक
हेही वाचा - बालसंरक्षण पथकाने कुर्डू गावात होणारा बालविवाह रोखला