सिंधुदुर्ग - जिल्ह्याच्या किनारी भागात आजपासून मत्स्यबंदी लागू झाल्याने हजारो मत्स्यनौका किनारी भागात अखेर विसावल्या आहेत. मालवण, विजयदुर्ग आणि देवगड बंदरात आज मच्छिमारांनी आपल्या बोटी नागरायला सुरुवात केल्याने बंदरात नौकांचा गलका झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान ही मासेमारी बंदी 31 जुलैपर्यंत कायम राहणार आहे. गेले काही महिने उलाढालच ठप्प झाल्याने मच्छीमारी व्यवसाय यंदा आतबट्यातच आहे.
किनाऱ्यावरील लोकवस्ती मासेमारीवर अवलंबून -
1 जून ते 31 जुलै या कालावधीत जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रामध्ये पावसाळी मासेमारी लागू करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याला 121 किलोमीटरची किनारपट्टी लाभली असून 20 हजार मेट्रिक टनाच्या जवळपास मासेमारी केली जाते. जिल्ह्यात मासळी उतरवून घेणारी 38 केंद्रे आहेत. किनारपट्टी भागातील 30 हजार कुटुंब प्रत्यक्ष मासेमारीवर अवलंबून आहे. तर या व्यवसायामुळे 15 हजार कुटुंबाला अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. जिल्ह्यात मच्छीमार सहकारी संस्था 34 असून एकूण सभासद संख्या 14 हजार 216 एवढी आहे. मान्सून तोंडावर आला आहे. शासनाने 1 जूनपासून मासेमारी बंदीचा आदेश जरी केला आहे. मालवण हे मच्छिमार व्यवसायाचे केंद्र आहे.
मच्छीमारी व्यवसाय यंदा आतबट्यातच -
निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे आधीच मासेमारी हंगाम मच्छीमारांच्या हातून निघून गेला आहे. वादळी वारे, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस आदींमुळे मासेमारी व्यवसाय अडचणीत आहे. त्यात हंगामाचे शेवटचे 2 महिने होते. ते देखील लॉकडाऊनमुळे निघून गेले. त्यामुळे मासळी उत्पादनावर यंदा मोठा परिणाम झाला आहे. वार्षिक मासळी उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटले आहे. काही महिने उलाढालच ठप्प झाल्याने मच्छीमारी व्यवसाय यंदा आतबट्यात आल्याचे चित्र आहे.
मासेमारी होती ठप्प असल्याने मच्छिमार कर्जबाजारी -
2018 पासून समुद्रात वेगवेगळी चक्रीवादळे येत आहेत. त्यामुळे येथील मच्छिमार आधीच बेजार झालेले असताना आता कोरोनाचे वाढत जाणाऱ्या संकटात मच्छिमारांचा यावर्षीचा हंगाम पूर्णतः मासेमारिशिवाय गेला आहे. त्यात तौक्ते चक्रीवादळाने याठिकाणी मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे इथला मच्छिमार मोठ्या प्रमाणावर बाधित झाला आहे. आधीच कोरोना आणि त्यात मासेमारी बंद असल्याने मच्छिमारांसमोर कर्जबाजारीपणाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. आता मच्छिमारी दोन महिने बंद राहणार असल्याने काय करावे, हा प्रश्न येथील मच्छिमारासमोर आहे.
हेही वाचा - पुण्यातील शिवाजीराव भोसले बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेचा दणका