सिंधुदुर्ग - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता वेगाने वाढू लागली आहे. कोरोनाने आता जिल्हा रुग्णालयात प्रवेश केला असून शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या पाच पॉझिटिव्ह अहवालात एका स्टाफ नर्सचा समावेश आहे. त्यामुळे इतर डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांनाही धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या 56 वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात शनिवारी रात्री आणखी पाच तर रविवारी तीन रुग्ण आढळले, अशी माहिती जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिली. एकूण 56 रुग्णांमधील सात रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एकाचा मृत्यू तर एक रुग्ण मुंबईला उपचारासाठी गेला. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये सध्या 47 रुग्ण औषधोपचाराखाली आहेत. कोरोना रुग्णांमध्ये मालवण तालुक्यातील हेदूळ गावची व सध्या रानबांबुळी येथे राहणाऱ्या स्टाफ नर्सचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये ती सेवा बजावत होती. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात कोरोनाने प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच जिल्हा रुग्णालयामध्ये काम करणारे डॉक्टर्स, नर्स व अन्य कर्मचाऱ्यांना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.