सिंधुदुर्ग - गेले पंधरा दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मसुरेसह लगतच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. रमाई व गडनदीच्या काठावरील भात शेती पूर्णत: पाण्याखाली गेली असून लावणी केलेला भात कुजून गेला आहे. त्यामुळे आर्थिक नुकसानी बरोबरच दुबार लावणीचे संकट या भागातील शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.
वेरली व मसुरे या गावातून वाहणारी रमाई नदी झाडे-झुडूपे व गाळाने भरून गेली आहे. उन्हाळ्यात पाण्याअभावी कोरडी पडणारी ही नदी पावसाळ्यात मात्र, थोड्याशा पावसाने भरून जाते व पात्र सोडून वाहू लागते. रमाई नदीचे पात्र कावावाडी येथे गडनदीस मिळते, तर दुसरी उपनदी खाजणवाडी मार्गे हुरास येथे गडनदीला मिळते. खाजणवाडी येथे पक्का बंधारा झाला असून हा बंधाराही काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग होण्यास अडथळा ठरत आहे. परिणामी नद्यांचे पाणी काठालगतच्या शेतांमध्ये शिरते.
रमाई नदी किनाऱ्यावरील बागायत, वेरली, मसुरे, देऊळवाडा, मर्डे, मागवणे, मेढा, गडघेरा, कावावाडी आदी भागात मोठय़ा प्रमाणात पुराचे पाणी घुसले. काही ठिकाणी लावणी झालेला भात पाण्याखाली गेला तर काही ठिकाणी लावणीसाठी ठेवलेली रोपे वाहून गेली. त्यामुळे शेतकऱयांसमोर आता दुबार लावणीची वेळ आली आहे. यांत्रिक नांगरणीचे भाडे, बियाणे आणि मजूरांची मजूरी यासाठी केलेला खर्च वाया गेला आहे. पावसाचा जोर आता कमी झाला असला, तरी काही भागात अजूनही पाणी साचून असल्याने शेतकऱ्यांना सध्या तरी दुबार लावणी करता येणार नाही. शासनाने तातडीने या भागातील शेतीची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.