सिंधुदुर्ग - जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची येथील नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. आठवले शुक्रवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. त्यांनी येथील वादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्थ भागाची पाहणी केली.
कणकवली, कुडाळ तालुक्यात केली पाहणी -
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जिल्ह्यात चक्रीवादळाची पाहणी करताना कणकवली तालुक्यातील ओसरगाव या ठिकाणी भेट देत घरांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्याचप्रमाणे झाडे, गोठे व अन्य बागायती यांचे झालेले नुकसान पाहणी करत शेतकऱ्यांना नुकसान मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांच्यासोबत कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे उपसभापती प्रकाश पारकर तहसीलदार रमेश पवार गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, कणकवली मुख्यअधिकारी अवधुत तावडे, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री उपस्थित होते. यानंतर आठवले यांनी कुडाळ तालुक्यातील नुकसानीचीही पाहणी केली.
चक्रीवादळात 72 कोटींचे नुकसान -
जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने झालेल्या नुकसानीचे 80 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यात 5,901 घरांची अंशतः पडझड झाली आहे तर 20 घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. यामुळे 10 कोटींचे नुकसान झाले आहे. मच्छिमारांचे 2 कोटी, जिल्हा परिषद शाळा तसेच आरोग्यकेंद्र इमारतींचे 10 कोटी, शेतकऱ्यांचे 10 कोटी, वीज महावितरणचे 40 कोटी असे मिळून जिल्ह्यात एकूण 72 कोटींचे नुकसान झाले आहे.