सिंधुदुर्ग - आज जागतिक पर्यावरण दिनादिवशीच जिल्ह्यात शाळकरी मुलांना जाळ्यात खवले मांजर सापडल्याची घटना घडली आहे. हे मांजर वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही घटना जिल्ह्याती मालवण तालुक्यातील सर्जेकोट गावातील आहे.
शाळकरी मुलांना खेळताना सापडले खवले मांजर
मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथील कमलेश पराडकर यांच्या घरासमोरील वडाच्या झाडाखाली एका जाळ्यात खवले मांजर अडकल्याचे स्थानिक ग्रामस्थांना शनिवारी ५ जून रोजी दिसून आले. वनविभागाच्या वतीने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. वन परिक्षेत्र कुडाळचे अखत्यारीत मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथे राजन आचरेकर यांना त्यांच्या घराच्या परिसरामध्ये लहान मुलांनी क्रिकेट खेळण्याच्या मैदानाच्या सभोवार लावलेल्या जाळ्यामध्ये खवले मांजर अडकल्याचे दिसून आले. वनक्षेत्रपाल कुडाळ अमृत शिंदे यांना कळविले असता परिमंडळ मालवणच्या कर्मचाऱ्यांनी दाखल होत खवले मांजराची जाळ्यातुन सुखरूप सुटका केली.
वनकर्मचाऱ्यांनी मांजराची जाळ्यातून सुटका करत सोडले नैसर्गिक अधिवासात
मालवणचे पशुवैद्यकीय अधिकारी दळवी यांचेकडून त्याची तपासणी करून खवले मांजरास नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे म्हणाले की वन्यप्राणी खवले मांजर ही अत्यंत दुर्मिळ प्रजाती असून त्यास वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ न्वये संरक्षण प्राप्त असून त्यास अनुसूचि १ मध्ये वर्गीकृत केले आहे. ग्रामस्थांनी वेळीच वनविभागास माहिती दिल्याने वन्यप्राणी खवले मांजराचा जीव वाचला असून खऱ्या अर्थाने जागतिक पर्यावरण दिन सार्थकी लावल्याबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले. यावेळी सर्जेकोट मिर्या बंदर सरपंच नीलिमा परुळेकर, भारती आडरकर, रोहन लाड व उपस्थित ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले. मालवण वनपाल श्रीकृष्ण परीट, वनरक्षक कांदळगाव, सारीक फकीर, वनमजूर अनिल परब, ग्रामस्थ यांनी बचावकार्य यशस्वी केले.