सिंधुदुर्ग - छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळा हटवण्याचे काम तेथील कॉंग्रेस आमदारांनी केले आहे. तेच ततेतील काँग्रेस कार्याध्यक्ष आहेत. त्यामुळे इथे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे आणि भाजपावर आरोप करायचे हे बंद करा, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. बेळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडण्यात आला आहे. त्याबाबत ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असेल तर त्याठिकाणी जाऊन आंदोलन करायला मी नेहमीच तयार आहे. मात्र, संजय राऊतांना ही वेळ का यावी? असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच देवेंद्र फडणवीसांशिवाय आंदोलन करत येणार नाही, याबाबत राऊतांनी विचार करायला पाहिजे, असेही ते म्हणाले.
कर्नाटकमधील बेळगाव येथील मनगुत्ती गावामध्ये पूर्वपरवानगी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता. मात्र, काही विध्वसंक लोकांनी रात्रीच्या अंधारात महाराजांचा पुतळा हटविण्याचे काम केले आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये रोष निर्माण झाला असून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. तसेच महाराजांचा पुतळा पुन्हा बसवावा, असे पत्र नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटक सरकारला पाठवले आहे.