सिंधुदुर्ग (दोडामार्ग) - अभियंता चिखलफेक प्रकरणी शुक्रवारी कणकवली न्यायालयाने नितेश राणे आणि इतर आरोपींना पोलीस कोठडी सुनावली. कायदा व सुव्यवस्थेची खबरदारी म्हणून सर्व आरोपींना वेगवेगळ्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. यात नितेश राणेंची दोडामार्ग पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.
दरम्यान आज नारायण राणेंनी नितेश यांची दोडामार्ग येथे जाऊन भेट घेतली. तसेच त्यांची विचारपूस केली. त्यानंतर पत्रकारांनी राणेंची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, ते पत्रकारांवरच संतापले. "दोन दिवस पहातोय मी. आता आंदोलने कशी करावी हे पत्रकरांकडूनच शिकायच आहे " अशी माध्यमांवरच त्यांनी आगपाखड केली.
खरंतर नितेश राणे यांचे चिखलफेक आंदोलनाचे कृत्य एखाद्या लोकप्रतिनिधीसाठी अशोभनीय आणि असमर्थनीय आहे. तसेच एखाद्या अधिकाऱ्यावर हल्ला करणेदेखील कायद्याने गंभीर गुन्हा आहे. असे असतानाही प्रथम पुत्राच्या चुकीची माफी मागणारे नारायण राणे आता मात्र या कृत्याचे खापर माध्यमांवर फोडू पाहत आहेत.