सिंधुदुर्ग - हे सरकार बलात्काऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहे. सत्ताधारी पक्ष आपली माणसे सांभण्याचं काम करत आहेत. आधी एकाने केले, आता शिवसेना करत असल्याचे सांगत भाजपचे खासदार नारायण राणे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका केली. तर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन भाजपने वनमंत्री संजय राठोड यांच्यावर जोरदार टीका करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
संजय राठोड मंदिरात जायला संत आहेत का?
पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचं नाव घेतले जात होते. ते 15 दिवसांपासून फरार होते. नंतर ते बाहेर पडले आणि मंदिरात गेले. मंदिरात जायला ते संत आहेत का? आरोपांना उत्तरे द्या, पळता कशाला, असा सवालही राणेंनी केला. तर सरकार विनयभंग, बलात्कार, हत्या प्रकरणातील लोकांना पाठीशी घालत आहे. सुशांतसिंग, दिशा सालियान, पूजा चव्हाण प्रकरणातील आरोपींनाही पाठीशी घालत आहेत. या सरकारला तसा परवाना दिला आहे का? असा प्रश्न करत राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली.
हेही वाचा - सरकारने वीज कनेक्शन तोडणी थांबवावी, अन्यथा.. देवेंद्र फडणवीसांचा इशारा
क्लिपचा आवाज खरा की खोटा? हे आधी सरकारने सांगावं -
काल (मंगळवारी) पोहरादेवीत कोण आला रे कोण आला बंजाऱ्यांचा वाघ आला, अशा घोषणा दिल्या जात होत्या. पूजा चव्हाण यांचा मृत्यू आत्महत्येने झाला की त्यांचा खून झाला हे समोर आलेले नाही. मात्र, राठोड आणि पूजा यांच्या अकरा व्हिडिओ क्लिप समोर आल्या आहेत. क्लिपचा आवाज खरा की खोटा? हे आधी सरकारने आम्हाला सांगावे, असेही नारायण राणे यावेळी म्हणाले.
नाहीतर मातोश्रीत एक पिंजरा लाऊन ठेवा -
बलात्कार केलेल्या माणसांना वाघ म्हणाल तुम्ही? ही कमाल आहे. मी आता त्यांना संत म्हणतो. संत संजय राठोड लगे रहो, असे म्हणतानाच समाजाच्या शक्ती प्रदर्शनावरही ते बोलले. समाजाने जो विकास कामे करतो त्याच्या पाठीमागे जावे. कुठलेही कृत्य करणाऱ्याच्या पाठीमागे जाऊ नये. वाघ असेल तर सरकारने सांभाळावे. पिंजऱ्यात ठेवा नाहीतर मातोश्रीत एक पिंजरा लाऊन ठेवा, अशी टीकाही राणेंनी केली.