सिंधुदुर्ग - केंद्र सरकारवर सूड उगवायला तुझी ताकद आणि औकात आहे का, अशा खालच्या शब्दांत भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. सूड उगवायला कायदा माहिती आहे का, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
तुम्ही मुंबई महानगरपालिकेत केलेला भ्रष्टाचार सांभाळा. चौकशीनंतर जी दशा होईल ती सांभाळा, असे राणे म्हणाले. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना धमक्या देऊ नका. आम्ही हात धुऊन मागे लागू, असा इशाराच राणे यांनी दिला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामना या सेनेच्या मुखपत्रासाठी कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली आहे. यामध्ये केंद्र सरकार त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या यंत्रणांचा वापर सूड उगवण्यसाठी करत असल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, कोणीही मागे लागल्यास आम्ही हात धुऊन मागे लागू असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले. आता नारायण राणे यांनी त्यावर टीका करत आम्ही मागे लागल्यास झोप येऊ देणार नाही, असा धमकीवजा इशारा दिला आहे. आम्हाला मातोश्रीच्या आतल्या आणि बाहेरच्याही कुंडल्या माहिती आहेत, असे म्हणत राणेंनी 'सामना'च्या मुलाखतीचा समाचार घेतला आहे.
निष्क्रिय मुख्यमंत्री
एक वर्षाचा निष्क्रिय आणि महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारा कारभार या मुख्यमंत्र्यांचा आहे. कोणत्याही विषयाचे ज्ञान नसलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला, म्हणून महाराष्ट्र पिछाडीकडे चाललाय. याला शिवसेनेसोबतच महाविकास आघाडी सरकारचे अन्य दोन्ही पक्ष जबाबदार आहेत, असे राणे म्हणाले. हे तीनही पक्ष एक विचाराचे नाहीत. फक्त सत्तेसाठी एकत्र आले आहेत. मंत्रीपदं मिळाली म्हणून राष्ट्रवादी सत्तेसाठी शिवसेनेसोबत आहे, अशा शब्दात नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली.
महाराष्ट्राला मुख्यमंत्री कर्तुत्त्ववान हवा, ड्रायव्हर नको
असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नाही, ऐकला नाही, अनुभवला नाही. एक वर्ष आमदार मंञ्यांना भेटू शकला नाही. जनतेला त्याचं दर्शन सुद्धा नाही. संजय राऊतांना कायतरी पदरात पाडून घ्यायचं आहे, म्हणून सारखी मुलाखत घेतो, असे राणे म्हणाले. राऊत मुलाखतीत प्रश्न विचारण्यासोबतच उत्तरही स्वतःच देतो. मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत मंत्रालयात गेला. महाराष्ट्राला मुख्यमंत्री चांगला पाहिजे, कर्तबगार ड्रायव्हर नाही. हा ड्रायव्हर आहे. महाराष्ट्राला मुख्यमंत्री कर्तुत्त्ववान हवा, ड्रायव्हर नको, असे राणे म्हणाले.
सुडाने वागायचे असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू'
महाविकास आघाडी सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला मुलाखत दिली. ही मुलाखत खासदार संजय राऊत यांनी घेतली.यावेळी केंद्राने सुरू केलेल्या इडीच्या कारवाईवरून त्यांनी भाजपावर निशाणा साधला. महाराष्ट्र मेल्या आईचं दूध प्यायला नसून, महाराष्ट्रात कोणी डिवचल्यास काय होतं याचे दाखले इतिहासात असल्याची मुख्यमंत्र्यांनी आठवण करून दिली. तसेच महाराष्ट्र कधी थांबला नसून थांबणारही नाही. मात्र, सूडचक्र करून महाराष्ट्राला आव्हान देणार असाल, तर आमच्याकडेही सुदर्शन चक्र आहे. आम्हीही मागे लावू शकतो, एवढं याद राखा, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले.