सिंधुदुर्ग - मराठा आरक्षण प्रश्नावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राजीनामा देऊन प्रश्न सुटणार नाही. त्यांनी जी मोहिम हाती घेतली ती भाजपमध्ये राहून घेतल्यास नक्कीच आरक्षण लवकर मिळेल. राजीनामा न देता आरक्षण देण्याची क्षमता आहे, अशा योग्य व्यक्तींना भेटलात ज्यांच्यात तर प्रश्न सुटू शकतो. त्यामुळे कृपया राजीनामा देऊ नये अशी विनंती खासदार नारायण राणे यांनी शुक्रवारी सिंधुदुर्गात नुकसानीची पाहणी दरम्यान बोलताना छत्रपती संभाजीराजेंना केली आहे. दरम्यान गुरुवारी नारायण राणे यांनी संभाजीराजे यांना फटकारले होते. यामुळे अचानक त्यांना राजीनामा देऊ नका म्हणणाऱ्या राणेंच्या शुक्रवारच्या वक्तव्याकडे आश्चर्याने पाहिले जात आहे.
भाजपात राहिलात तरच आरक्षणाचा प्रश्न सुटेल..
मराठा आरक्षणाच्या विषयावरून खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत नारायण राणे यांना विचारले असता त्यांनी छत्रपतींनी राजीनामा न देता योग्य व्यक्तीला भेटलात तर लवकरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे काल गुरुवारी बोलताना नारायण राणे यांनी संभाजी राजे छत्रपती यांना मराठा समाजाचे हे आता नवीन नेते झालेत फिरुदेत त्यांना असं एका प्रश्नावर बोलताना म्हणाले होते.
गुरुवारी काय म्हणाले होते नारायण राणे?
खासदार संभाजी राजे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवरून भाजपचे खासदार नारायण राणेंनी राज यांना चिमटे काढलेत. म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात आता हे मुख्यमंत्र्यांना सांगणार का असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला. 'संभाजी राजे फिरतायत ना.. नवीन नेते आता होतायत तर होवू देत' असा टोला देखील नारायण राणेंनी लगावलाय. मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकार गंभीर नाही, असं विधान काही दिवसांपुर्वी संभाजी राजे यांनी केलं होतं. ज्यांनी खासदारकी दिली त्यांच्या संदर्भात असं विधान करणं चांगलं नाही असे सुनावले. तसेच मराठा समाजाला भाजपा सरकारने दिलं असंही म्हणाले. ज्यांच्या दारी फिरताय त्यांनी काय केलं. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते त्यांनी काय केलं. मराठा आरक्षणा संदर्भात ठाकरे सरकार किती गंभीर आहेत. स्वतः उद्धव ठाकरे हे मराठा समाज्याला आरक्षण द्यावे या मताचे नसल्याचा आरोप नारायण राणेंनी केला.
भरीव रक्कम द्यावी अन्यथा आम्ही आंदोलन करू..
देवबाग येथे पाहणी दरम्यान, खासदार नारायण राणे म्हणाले, की मालवणात चक्री वादळाने नुकसान झाले असताना येथील आमदार, खासदार काय करतात. मदत फक्त भाजप करत आहेत. स्वतः कॉन्ट्रॅक्टर असणाऱ्या आमदार वैभव नाईक यांनी देवबागचा बंधारा बांधण्याचे कॉन्ट्रॅक्ट घ्यावे. दोन शब्द विधानसभेत बोलता येत नाही आणि आमदार, कणकवली बाजारात पाठवण्या ऐवजी जनतेने विधानसभेत पाठवले. यांना उघडे पडल्याशिवाय गप्प बसणार नाही. असा घणाघात भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर केला.