सिंधुदुर्ग - परराज्यातील ट्रॉलर्स राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये घुसखोरी करून मासळी पळवतात. याबाबत त्यांना रोखण्यासाठी लवकरच जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रामध्ये हायस्पीड नौका दाखल होणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मच्छिमारांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी मच्छिमारांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच राज्याच्या सागरी क्षेत्रात येणाऱ्या परराज्यातील ट्रॉलर्सचा पाठलाग करुन त्या पकडण्यासाठी लागणाऱ्या नौका आपल्या पोलीस दलाकडे नाहीत. असे सांगून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांसाठी लवकरच हायस्पीड नौका उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - उदय सामंतांच्या उपस्थितीत शिव भोजन थाळीला सुरुवात; उपोषणकर्त्यांची नाराजीही केली दूर
या नौका आल्यानंतर परराज्यातून घुसखोरी करणाऱ्या नौकांना पकडणे सहज शक्य होणार आहे. तसेच जीपीएसच्या माध्यमातून या नौका ट्रेस करण्याच्या सूचना समांतर यांनी पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांना दिल्या. यावेळी मच्छिमार संघटनेने समुद्रामध्ये ड्रोनच्या माध्यमातून गस्त घालण्याची मागणी केली. त्यावर, अशा प्रकारे गस्त घालणे शक्य नसून त्यासाठी अत्याधुनिक नौकाच हव्यात असे पालकमंत्री यावेळी बोलताना म्हणाले.
हेही वाचा - 'सिंधुदुर्गसाठी 240 कोटींच्या जिल्हा वार्षिक आराखड्यास मंजूरी'