सिंधुदुर्ग - जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे समुद्राला देखील उधाण आले आहे. देवगड तालुक्यातील मळई, विरवाडी, गिर्ये आणि आनंदवाडी आदी भागांत समुद्राच्या उधानाचे पाणी शिरले. तर मालवणमधील ख्रिश्चन वाडीला उधनाच्या पाण्याचा फटका बसला आहे.
आनंदवाडी भागात बंदर प्रकल्पाचे भराव टाकण्याचे काम सुरू आहे. हा भराव समुद्रातील गाळ न काढता टाकण्यात येत आहे. त्यामुळे समुद्राच्या उधानाचे पाणी यावर्षी अधिक प्रमाणात भरले असल्याचे मच्छिमार नेते भाई खोबरेकर यांनी सांगितले.
देवगड मध्ये समुद्राच्या उधानाचे पाणी किनाऱ्यावर नांगरून ठेवलेल्या नौका आणि खोपींपर्यंत पोहचल्याने काही मच्छिमारांचे नुकसान झाले आहे. तर आनंदवाडी येथील रहिवासी ज्योती वरडकर यांच्या घराला पाण्याने तीनही बाजूने वेढल्याने धोका निर्माण झाला आहे. मालवण मधील ख्रिश्चनवाडीत देखील भरतीचे पाणी घुसल्याने येथील नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान, भरतीचे पाणी नागरी वस्तीत शिरु नये यासाठी धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी होत आहे.