सिंधुदुर्ग- रेल्वेतून गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक करणार्या अॅन्थॉनी डिसोजाला रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेतले आहे. मुंबईच्या दिशेने जाणार्या मांडवी एक्स्प्रेसमध्ये गुरुवारी सावंतवाडी ते कुडाळ स्थानकादरम्यान ही कारवाई करण्यात आली.
कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या गाड्यांमधील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसावा यासाठी रेल्वे सुरक्षा बलाकडून सरप्राईज चेकींग ही मोहिम राबविली जाते. गुरुवारी नेहमी प्रमाणे मांडवी एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षाबलाचे कॉन्स्टेबल राजेश कांदळकर यांनी सावंतवाडी स्टेशनवरून ही तपासणी सुरू केली. त्यावेळी मांडवी एक्स्प्रेसच्या पुढील जनरल डब्यामध्ये एक संशयास्पद बॅग आढळून आली.
अधिक चौकशी केली असतात ती बॅग अॅन्थॉनी डिसोजा याची असल्याचे निष्पन्न झाले. बॅगची झाडाझडती घेतल्या नंतर त्यात ५०० मि. ली. बियरच्या ४८ बोटल्स आढळून आल्या. दरम्यान, आरोपीला उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.