सिंधुदुर्ग - अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा सिंधुदुर्गच्या किनारपट्टी भागाला बसला आहे. वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे दिवाळी सणाच्या उत्साहावर ही विरजण पडले आहे.
मालवण तालुक्यात सकाळपासूनच लाटांचे पाणी सिंधुदुर्ग किल्ल्यासह मेढा, राजकोट, आचऱ्यातील जामडूल बेट, देवबाग येथील वस्तीत घुसले. शहरातील बंदर जेटी, मोरेश्वर वाडी, दांडी, तळाशील, तारकर्ली किनारपट्टी भागालाही उधाणाचा फटका बसला आहे. वेंगुर्ले किनारपट्टी भागातही हीच परिस्थिती असून शिरोडा, उभादांडा, वेंगुर्ले-मांडवी, केळूस-कालवी किनारपट्टीवर हाहाकार माजला आहे. समुद्राच्या अजस्त्र लाटा किनाऱ्यावर धडकत असून पाण्याचा जोर असाच कायम राहिल्यास किनाऱ्यालगतच्या घरांना धोका उद्भवण्याची शक्यता आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा जोर वाढल्याने किनारपट्टी भागात घबराट पसरली आहे. दरम्यान प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार क्योर चक्रीवादळामुळे समुद्रात ताशी 45 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत तरी मच्छिमार व पर्यटकांना समुद्रात न जाण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे .