सिंधुदुर्ग - राज्यात भाजपा-शिवसेनेच्या युतीबाबत कोणताही विचार आणि चर्चा आजतरी नाही, असे भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. गाठीभेटी या होतच असतात, त्याचा अर्थ युती होईल असा नाही. असे सांगतानाच प्रताप सरनाईक यांनी लिहिलेले पत्र हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यावर पक्षांतर्गतच निर्णय घ्यावा लागेल, असेही शेलार म्हणाले.
हेही वाचा - 'सिंधुदुर्गात मृत्यूची आकडेवारी अजिबात लपविली जात नाही'
आमदार प्रताप सरनाईक यांचे पत्र त्यांच्या पक्षांतर्गत विषय
सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या आमदार आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा भाजप व शिवसेना युतीबाबत काहीच चर्चा नसल्याचे म्हटले. तर, प्रताप सरनाईक यांच्या पत्राबाबत बोलताना ते म्हणाले की, एका आमदाराने त्यांच्या पक्ष प्रमुखाला लिहिलेले ते पत्र आहे. तो त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. त्यामुळे, याबाबतचा निर्णय त्यांना पक्षांतर्गतच घ्यावा लागेल. तेवढी सुबुद्धी त्यांच्याकडे असावी, अशी अपेक्षा आहे.
संजय राऊतांचा 'तो' पारिवारिक प्रश्न
शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर एका महिलेने त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. याबाबत बोलताना आशिष शेलार म्हणाले की, जी मला माहिती आहे, ती जर त्याच महिलेबद्दल असेल, त्यांच्या परिवारातील, तर हा पारिवारिक प्रश्न आहे. हा राजकीय प्रश्न करू नये, अशी माझी भूमिका आहे. त्यांच्या परिवारात असलेल्या भांडणात राजकीय हात घालणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. एवढाच मी सांगेन.
खासदार विनायक राऊत मातोश्रीच्या जवळ राहिले आहेत की नाही, हा प्रश्न आहे
खासदार विनायक राऊत यांच्यावर बोलताना त्यांनी टीका केली. ते म्हणाले, खासदारांनी विषय अभ्यासपूर्ण मांडले तर बरे होईल, हे सांगण्याची वेळ आली आहे. स्वतः देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांशी वादळाच्या दिवशी, त्याच्या आधी आणि नंतर फोनवरून चर्चा केली आहे. आपापल्या मुख्यमंत्र्यांशी केंद्रातल्या कोणत्या मंत्र्यांचा मदतीसाठी संपर्क चालू आहे, याची अनभिज्ञता खासदारांना असेल तर ते मातोश्रीच्या जवळ आता राहिले आहेत की नाही, हा प्रश्न आहे.
हेही वाचा - राज्य सरकार श्राद्ध केल्यासारखे अधिवेशन उरकणार - आमदार आशिष शेलारांची टिका