सातारा - जिल्ह्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे हा 39.671 किलोमीटरचा रस्ता एका दिवसात तयार करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने नवा विश्वविक्रम स्थापित केला आहे. विजापूर-सोलापूर हा 25.54 किलोमीटरचा रस्ता 18 तासांत पूर्ण करुन यापुर्वीच्या जलद रस्त्याचा विक्रम यामुळे मोडला आहे.
पुसेगाव - म्हासुर्णे रस्त्याचा विश्वविक्रम
सातारा-पंढरपूर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरु आहे. याअंतर्गत पुसेगाव ते म्हासुर्णे रस्ता तयार करण्याचा नवा विश्वविक्रम करण्यात आला आहे. हे काम 3 शिफ्टमध्ये एकाचवेळी 6 ठिकाणी करण्यात आले. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 15 अभियंत्यांनी काम पाहिले. उद्योजकामार्फत 60 अभियंते, 47 पर्यवेक्षक, 23 गुणवत्ता नियंत्रक अभियंते, 150 वाहन चालक, 110 मजूर असे एकूण 390 कर्मचाऱ्यांद्वारे काम करण्यात आले.
1100 मेट्रीक टन डांबर, 6 हजार घनमीटर खडी
गुणनियंत्रक पथकामार्फत कामाच्या गुणनियंत्रणासाठी बिटुमिन एक्सट्रॅक्टर, बिटुमिन पेनीट्रोमीटर, केंबरप्लेंट, सिव्हस् यासारखे साहित्य वापरण्यात आले. तसेच या कामासाठी 8 मॉडर्न बॅचमिक्स प्रकारे हॉटमिक्सर प्लॅन्ट, 7 मॉर्डन सेन्सर पेव्हर, 12 व्हायब्रेटरी रोल, 6 न्युमॅटीक रोलर 180 डंपर (हायवा) व अन्य यंत्रसामुग्रींचा वापर करण्यात आला. 1100 मेट्रीक टन डांबर व 6 हजार घनमीटर खडीचा वापर करण्यात आल्याचे अधीक्षक अभियंता संजय मुनगीलवार यांनी सांगितले आहे.
असा झाला विक्रम
या विक्रमी प्रयत्नांची अंमलबजावणी करण्यासाठी ३० किलोमीटर रस्त्याची सहा तुकड्यात विभागणी करण्यात आली. प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पथके कार्यरत होती. या कामासाठी एकूण ११ हजार मेट्रीक टन बिटुमन काँक्रीट, त्यासाठी आठ हॉट मिक्स प्लांट होते. काँक्रीटचे हे मटेरीअल पसरविण्यासाठी सहा पेव्हर, १२ टँडम रोलर व सहा पीटीआर तसेच मटेरीअलची ने-आण करण्यासाठी १८० हायवा टिप्पर वापरण्यात आले.
४७४ कर्मचारी तैनात
प्रकल्प व्यवस्थापक, तीन हायवे इंजिनिअर, दोन क्लालिटी इंजिनिअर, दोन सर्व्हेअर आणि ७१ कर्मचारी असे एकूण ७९ कर्मचारी एका टीममध्ये होते. एकूण सहा भागांचे मिळून ४७४ कर्मचारी पुर्ण कामासाठी तैनात होते. यासाठी व्यवस्थापन थिंक टँक व वॉर रूम उभारण्यात आली होती. लिंम्का बुकमध्ये या विक्रमाची नोंद करण्यात येत आहे.
हेही वाचा-राज्यात 15 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला, असे असतील पॉझिटीव्हीटी रेटनुसार नवीन नियम