सातारा - गेली वर्षभर कोरोना महामारीशी लढताना शेतकर्यांनी अन्नधान्याची कमतरता जाणवू दिलेली नाही. सध्या नैसर्गिक आपत्ती, लॉकडाउन व अन्य कारणाने शेतीचे मोठे नुकसान होत असताना, खतांच्या केलेल्या दरवाढीमुळे शेतीचे अर्थकारण पूर्णत: कोलमडून पडेल. त्यामुळे खतांची दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि केंद्रीय खत व रसायन मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
'शेतकर्यांनी देशाला अन्नधान्याची कमतरता जाणवू दिली नाही'
शेतकरी सर्वांच्या खांद्याला खांदा लावून कोरोना महामारीचा सामना करीत आहे. गेल्या वर्षी इतर क्षेत्रातील उत्पादन घसरले. परंतु, शेतकर्यांनी देशाला अन्नधान्याची कमतरता जाणवू दिली नाही. कृषी उत्पादन टिकविण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. वारंवार लागू केल्या जाणार्या लॉकडाउनमुळे कृषी-पणन यंत्रणेत व्यत्यय येत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी सरकारी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहे. परंतु, दुर्दैवाने सरकारने त्यांची घोर निराशा केली आहे. कृषी क्षेत्राला दिलासा देण्याऐवजी सरकारने खतांच्या किंमती वाढविल्या आहेत. त्यामुळे शेतकर्यांमध्ये सरकार विरोधात असंतोष असल्याचे खा. पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.
'केंद्र सरकारने खतांची दरवाढ तत्काळ मागे घ्यावी'
खरीप हंगाम तोंडावर आहे. शेतकऱ्यांचे पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. मात्र, खते आणि कीटकनाशकांच्या या वाढीव किंमतीचा मोठा परिणाम होऊन अन्नधान्याच्या किंमती देखील वाढतील. परिणामी देशातील शेतकरी, कष्टकरी, मजूर व सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्लिक होईल. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने खतांची दरवाढ तत्काळ मागे घ्यावी आणि पूर्वीच्याच दराने शेतकर्यांना खते उपलब्ध करून द्याव्यीत, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी कृषी आणि खते व रसायन मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
हेही वाचा - खतांच्या वाढलेल्या किमतींच्या विरोधात काँग्रेस करणार घंटानाद आंदोलन