कराड /सातारा: मृत शोभा पवार यांची आई कालाबाई यशवंत चव्हाण (रा. बामणेवाडी, ता पाटण) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, शोभा हिचा विवाह गुलाब पवार (रा. म्हारखंड, ता. पाटण) यांच्याशी झाला होता. पतीचे निधन झाल्यानंतर शोभा मुंबईला कामाला गेली होती. नातू रोशन हा सातारा येथे शिकत आहे. शोभा मुंबईहून दि. २० मार्च रोजी बामणेवाडीला आली होती. त्यानंतर ती दि. २२ मार्चला पाटण येथे कामानिमित्त जाते, असे सांगून म्हारवंडला गेली. ती परत बामणेवाडीला न आल्याने आम्ही शोभाला शोधण्यासाठी तिच्या सासरी म्हारवंडला गेलो. त्यावेळी शोभा ही प्रकाश निकम यांच्या घरी गेली आहे. ते लग्न करणार आहेत, अशी माहिती सासरच्या लोकांनी दिली.
शोभाचे नातेवाईक प्रकाश निकमच्या घरी गेले असता प्रकाश आणि शोभा फोन लावण्यासाठी धावडमळी शिवाराकडे गेल्याचे त्याच्या पत्नीने सांगितले. सर्वजण रात्री १२ च्या सुमारास धावडमळी शिवारात गेले असता दोघांनी आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. मृत प्रकाशचा भाऊ सावळा भिकू निकम याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत त्याने या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. विधवा महिला आणि विवाहित पुरूषाने केलेल्या आत्महत्येमुळे पाटण तालुका हादरला आहे. पाटणचे पोलीस निरीक्षक एन. आर. चौखुंडे हे या घटनेचा तपास करत आहेत.